Equity Mutual Fund Inflow August surge: बाजारात अस्थिरता असूनही गुंतवणूकदारांची मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांना पसंती कायम असल्यामुळे, सरलेल्या ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये २९,३२९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. गेल्या चार महिन्यांतील हा उच्चांक ठरला आहे. विशेष म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून होणारी मासिक गुंतवणूकही ऑगस्टमध्ये ३२,२९७ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये २४,६९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत ऑगस्टमधील गुंतवणुकीत सुमारे १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एसआयपीच्या माध्यमातून जुलैमध्ये ३१,९६१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ऑगस्टमध्ये त्यात वाढ होऊन ती ३२,२९७ कोटी रुपयांवर पोहोचली. ऑगस्ट २०२५ मधील २८,२६५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाची एसआयपी गुंतवणूक सुमारे १४ टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत एसआयपीच्या माध्यमातून सुमारे १.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये २ लाख कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली होती.

‘विक्रमी एसआयपी गुंतवणूक आणि गुंतवणूक थांबविण्याचे प्रमाण (स्टॉपेज रेशो) कमी होणे, यामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये शिस्त वाढत असल्याचे दिसून येते,’ असे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे अध्यक्ष आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौगता चॅटर्जी यांनी सांगितले.

लघु व मध्यम समभागांना पसंती

इक्विटी फंडांमध्ये सर्वाधिक ७,९७३ कोटी रुपयांची गुंतवणूक स्मॉल-कॅप फंडांच्या माध्यमातून झाली. त्यापाठोपाठ मिड-कॅप फंडांमध्ये ६,९८९ कोटी आणि फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये ५,०५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मात्र, लार्ज-कॅप फंडांमधून १,१४७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप या दोन्ही प्रकारच्या फंडांमध्ये मिळून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मार्चमध्ये बाजाराने तळ गाठल्यानंतर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांनी चांगली कामगिरी केली आहे. या तेजीमध्ये गुंतवणूकदारांनीही सहभाग घेतल्याचे दिसते, असे जर्मिनेट इन्व्हेस्टर सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोसेफ यांनी सांगितले.

एकूण म्युच्युअल फंड प्रवाह घटला

इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढली असली तरी, म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण निव्वळ गुंतवणूक ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात घटून ४१,३५३ कोटी रुपये राहिली. जुलैमध्ये हा आकडा २.३६ लाख कोटी रुपये होता. यामागे प्रामुख्याने कर्जरोख्यांशी संबंधित योजनांमधील गुंतवणुकीचा ओघ उलटल्याचा परिणाम आहे. डेट योजनांमधून ऑगस्टमध्ये ८,१२७ कोटी रुपयांची निव्वळ रक्कम बाहेर पडली, तर जुलैमध्ये या योजनांमध्ये १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ओव्हरनाइट फंडांमधून सर्वाधिक ३०,६५४ कोटी रुपये बाहेर पडले. त्यानंतर शॉर्ट टर्म फंडांमधून ४,२५९ कोटी आणि कॉर्पोरेट बाँड फंडांमधून ३,१९० कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली.

म्युच्युअल फंडांची मालमत्ता वाढली

दरम्यान, एकूण प्रवाहात घट झाली असली तरी म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) वाढ झाली. ऑगस्टअखेरीस एयूएम ८७.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जुलैअखेरीस तो ८५.७६ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच एका महिन्यात सुमारे १.५ टक्क्यांची वाढ झाली.

ऑगस्टमध्ये एकूण २६ नवीन म्युच्युअल फंड योजना बाजारात दाखल झाल्या. या योजनांच्या माध्यमातून ७,११० कोटी रुपये उभारण्यात आले, अशी माहिती अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चलसानी यांनी दिली.

सोन्याच्या ईटीएफलाही मागणी

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबरोबरच सोन्याच्या ईटीएफलाही गुंतवणूकदारांची पसंती कायम राहिली. ऑगस्टमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २,५९७ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. जुलैमध्ये १,५५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्याचप्रमाणे सिल्व्हर ईटीएफमध्ये ऑगस्टमध्ये १,२७१ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.