Franklin Templeton Equity Mutual Fund : शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यासच इक्विटीमधून उत्तम परतावा मिळवणे शक्य आहे. इराण युद्ध, तेलाच्या किमतीतील वाढ आणि महागाईच्या अनिश्चिततेतही भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम देशांतर्गत मागणी भांडवली बाजाराला मजबूत पाठबळ देत आहे, असा विश्वास फ्रँकलिन टेम्पलटनचे मुख्य गुंतवणूक अधिकारी जानकीरामन आर यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या वाचकांना तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीची थोडक्यात ओळख करुन द्या.
मी अभियांत्रिकीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोईम्बतुर येथून पदवी घेतली असून आयआयएम बंगळुरू येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका घेतली आहे. माझे पदव्युत्तर शिक्षण १९९५ मध्ये पूर्ण करून मी युटीआय सेक्युरीटीज मध्ये रुजू झालो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मला समभाग संशोधन आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. पहिली चार वर्षे मी यूटीआय सिक्युरिटीजमध्ये समभाग संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर सुमारे सात वर्षे मी चेन्नईमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होतो, जी प्रामुख्याने एक गुंतवणूक कंपनी होती. आता अशा कंपनीला ‘फॅमिली ऑफिस’ म्हणतात. त्या नंतर २००७ पासून मी फ्रँकलिनमध्ये आहे, म्हणजे आता जवळपास २० वर्षे झाली मी फ्रँकलिन टेम्पलटनच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या चमूचा भाग आहे. एकंदरीत, या संपूर्ण ३० वर्षांच्या काळात मी माझा बहुतेक वेळ भांडवली बाजाराच्या गुंतवणूक क्षेत्रातच घालवला आहे.
एका फंड मॅनेजरच्या दृशिकोनातून तुम्ही सध्याच्या बाजाराकडे कसं बघता?
गुंतवणूकदारांनी बाजाराकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत: एक अल्प-मुदतीचा दृष्टिकोन आणि दुसरा मध्यम-मुदतीचा किंवा दीर्घ-मुदतीचा दृष्टिकोन. दुर्दैवाने, आपण अल्पकालीन दृष्टिकोनावर खूप वेळ व्यर्थ घालवतो, ज्याला खरंतर काही महत्त्व नाही, आणि आपण दीर्घ-मुदतीच्या दृष्टिकोनावर पुरेसा वेळ देत नाही, आणि अंतिमतः दीर्घ-मुदतीचा दृष्टिकोनच परतावा देतो. भारत अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहे. आपली सुमारे ७% दराने वाढण्याची क्षमता ही एक वरवरची अपेक्षा आहे, कारण हे भविष्य आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही भविष्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही नेहमी त्या भविष्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. पण त्या मर्यादा असूनही, मी म्हणेन की दीर्घ-मुदतीच्या दृष्टिकोनातून बाजार खूपच चांगला दिसतो, आणि त्याची मुख्य कारण आपली अर्थव्यवस्था देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे. आपली मागणी स्थिर असल्याने आपल्याला जागतिक कल किंवा जागतिक आर्थिक आवर्तनांवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही, यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य लाभते. म्हणूनच, विशेषतः जेव्हा अल्पकालीन दृष्टिकोन थोडा अनिश्चित असतो आणि मनात अनेक शंका असतात, तेव्हा दीर्घकालीन फायदे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरते. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत मी असा विचार करेन, कारण आपण इराण युद्ध आणि त्यामुळे होणारी तेलाच्या किमतीतील वाढ, वाढती महागाई, वाढते व्याजदर यांबाबतच्या अल्पकालीन अनिश्चिततेतून जात आहोत. या गोष्टींचा अंदाज लावणे आणि पुढील एका वर्षात परिस्थिती कशी असेल हे सांगणे खूप कठीण आहे. पण मला वाटते की दीर्घकालीन दिशा अधिक स्पष्ट आहे आणि त्यामुळे किमान मला तरी आत्मविश्वास मिळतो, म्हणूनच मी गुंतवणूकदारांना सांगेन की त्यांनी समभाग गुंतवणूक करण्यास बिलकुल कचरता कामा नये.
इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात?
बाजाराने बरेच धडे शिकवले. इथे आजचा बाजार कालच्या सारखा नसतो, म्हणूनच इथे रोजचा दिवस नवीन शिकण्याचा असतो. परंतु मी म्हणेन की काही महत्त्वाचे अनुभव, महत्त्वाचे शिकणे म्हणजे या मार्केटमध्ये आपले कौशल्य प्रदर्शित करण्याचा मार्ग आहे. चांगला दीर्घकालीन परतावा मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही आणि तुम्ही प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या क्षमतेला, स्वभावाला अनुकूल असा मार्ग निवडला पाहिजे. हा एक महत्त्वाचा धडा आहे जो मी शिकलो आहे, की तुमच्या क्षमतेनुसार योग्य दृष्टिकोन निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे, या सर्व कार्यशैली एका आवर्तनातून जातात; जेव्हा त्या ते आवर्तन समजून घ्या तुम्ही समजून घेतलं नाहीत तर खूप चिंता करावी अशी परिस्थिती निर्माण होते. तुम्हाला थोडे लवचिक राहावे लागते, पण मला वाटते की तुम्ही एका मूळ तत्त्वज्ञानाला चिकटून राहिले पाहिजे, नाहीतर तुम्ही कोणताही आधार नसताना अनेक गोष्टी करू लागता. तर, मला वाटते की या दोन गोष्टी मी शिकलेल्या काही प्रमुख गोष्टी आहेत.
तुम्ही म्युच्युअल फंड युनिट धारकांना काय संदेश द्याल?
मला वाटते की, फ्रँकलिनच्या अनेक फंडांनी आता ३० वर्षे पूर्ण केली आहेत, आणि जेव्हा आम्ही गुंतवणूकदारांशी याबद्दल बोलतो, तेव्हा त्यांच्यापैकी बरेच जण म्हणतात की, ‘बघा, गेले ३० वर्षे खूपच समाधान देणारी होती, किमान जेव्हा तुम्ही सीएजीआर (CAGR) परतावा पाहता तेव्हा तरी.’ पण साहजिकच प्रश्न हा आहे की, भविष्याबद्दल काय?
मी म्हणेन की, गेल्या ३० वर्षांमध्ये, मध्ये अनेक भूराजकीय आणि आर्थिक संकटे किंवा अस्थिरता असूनही, परतावा चांगला राहिला आहे. त्यामुळे, वास्तव हे आहे की जीवनात अशा प्रकारची संकटे किंवा अस्थिरता येतच राहतील, ती अनेक दिशांनी येतील, पण मला वाटते की विकासाची मूळ गती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पुढे नेत राहील. त्यामुळे, हीच सर्वात मोठी ताकद आहे, याचा अर्थ असा की गुंतवणूकदार ५ ते २० वर्षांपर्यंत एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतात, त्यामुळे, दृष्टिकोन जितका दीर्घ असेल, तितका परिणाम अधिक चांगला असेल, कारण दीर्घ कालावधी अस्थिरता चांगल्या प्रकारे शोषून घेईल. म्हणून, मी म्हणेन की अल्प मुदतीसाठी, विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, अंदाज लावणे खूप कठीण आहे, पण मला वाटते की एकदा तुम्ही त्या ३ वर्षांच्या कालावधीच्या पुढे गेलात की, अपेक्षित परतावा, त्या सर्व गोष्टी अधिक चांगल्या दिसू लागतात, आणि मला खात्री आहे की प्रमुख मालमत्ता वर्गांमध्ये, या दीर्घ कालावधीत, इक्विटी हा सर्वोत्तम कामगिरी करणारा मालमत्ता वर्ग राहील.
संकलन : वसंत माधव कुळकर्णी
संकल्पना : गौरव मुठे
