Gold ETF vs Small Cap Mutual Funds: बऱ्याच काळापासून सोने आणि ‘स्मॉल-कॅप’ शेअर्सकडे परस्परविरोधी पर्याय म्हणून पाहिले जात असे. सोने हा गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातो, तर स्मॉल-कॅप शेअर्समधील गुंतवणूक हा एक धाडसी किंवा आक्रमक निर्णय मानला जातो. मात्र, ऑगस्ट महिन्यातील म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा ओघ काही वेगळेच चित्र मांडतो.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने १० सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी स्मॉल आणि मिड-कॅप फंडांमध्ये जवळपास १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे ‘गोल्ड ईटीएफ’मध्येही मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आहेत.
याचा अर्थ गुंतवणूकदार अचानक अधिक आक्रमक झाले आहेत, असा कदाचित होत नाही. त्याऐवजी, जोखीम पत्करतानाच त्यासोबतच सुरक्षिततेची (‘हेजिंग’ची) तरतूद ठेवण्याबाबत ते अधिक अनुकूल होत असावेत, असे यातून दिसून येते.
आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये स्मॉल-कॅप फंडांना ७,९७३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली, जी जुलै महिन्यातील ७,७६८ कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक होती. तसेच, मिड-कॅप फंडांमध्ये ६,९८९ कोटी रुपयांची भर पडली. याआधीच्या महिन्यात ही रक्कम ६,१९२ कोटी रुपये इतकी होती. या दोन्ही श्रेणींमध्ये मिळून ऑगस्टमध्ये एकूण १४,९६२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जुलै महिन्यातील १३,९६० कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम सुमारे १,००० कोटी रुपयांनी अधिक होती.
गोल्ड ईटीएफबाबत बोलायचे झाल्यास, त्यात ऑगस्टमध्ये २,५९७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही जुलैमधील १,५५९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गोल्ड ईटीएफ मालमत्ता देखील ऑगस्टमध्ये १०.३% वाढून १.९१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी जुलैमध्ये १.७३ लाख कोटी होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे म्हणणे आहे की वर्षभरात एयूएममध्ये झालेली तीव्र वाढ सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.
सोने, चांदी आणि स्मॉल कॅप
‘अल्फा एएमसी अँड प्लॅनिफाय’चे सीईओ आणि फंड मॅनेजर राजेश सिंगला यांच्या मते, ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी गुंतवणूकदारांच्या बदलत्या वर्तणुकीचे निदर्शक आहे. “ऑगस्ट महिन्यातील गुंतवणुकीचा ओघ केवळ गुंतवणुकीची इच्छा किंवा भूक दर्शवत नाही, तर तो गुंतवणूकदारांचा परिपक्व होत जाणारा विश्वास दर्शवतो.”
गुंतवणूकदार एकाच वेळी स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप फंडांमध्ये पैसे गुंतवत असताना सोने आणि चांदीच्या ईटीएफची (ETFs) खरेदी करत आहेत, यात काही विसंगती नाही, असे ते म्हणतात. बाजारातील अस्थिरतेपासून पोर्टफोलिओचे संरक्षण करतानाच वाढीच्या संधींचा लाभ घेण्याचा प्रयत्न ते करत असावेत.
“एका पर्यायाची निवड करण्याऐवजी, गुंतवणूकदार अस्थिरतेपासून बचाव करत असतानाच वाढीच्या संधींमध्ये गुंतवणूक कायम ठेवत आहेत”, असे सिंगला यांनी म्हटले.
