HDFC Mutual Fund Market Outlook : शेअर बाजारातील गेल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एचडीएफसी म्युच्युअल फंडचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक गोपाल अगरवाल यांनी सध्याच्या बाजार स्थितीवर आणि भविष्यातील संधींवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला आहे. कोटक सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार, लार्जकॅप समभाग सध्या त्यांच्या १० वर्षांच्या सरासरी मूल्यांकनाच्या तुलनेत ८ टक्के सवलतीवर उपलब्ध असून मध्य ते दीर्घ मुदतीसाठी ही एक आकर्षक गुंतवणुकीची पातळी मानली जात आहे.
आमच्या वाचकांना तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीची थोडक्यात ओळख करुन द्या
मी अभियांत्रिकीत पदवी घेतली असून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आयआयएम कोलकोता येथून घेतली आहे. मी काही काळ एका अग्रगण्य पेट्रोकेमिकल आणि केमिकल कंपन्यांमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ केमिकल इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर, मे २००२ मध्ये मी भांडवली बाजारातील (कॅपिटल मार्केट्स) माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. वित्तीय क्षेत्रातील (फायनान्स) माझ्या प्रवासाची सुरुवात ‘सेल-साइड’ (sell-side) विश्लेषक म्हणून (एका ब्रोकिंग कंपनीत) झाली, जिथे मी तेल आणि वायू (oil and gas), ऊर्जा आणि धातू (metals) या क्षेत्रांचा अभ्यास व विश्लेषण केले. समभागांची अचूक निवड करण्याच्या कौशल्यामुळे मला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच ‘बाय-साइड’ (buy-side) (म्युच्युअल फंड) मध्ये जाण्याची संधी मिळाली आणि डिसेंबर २००३ मध्ये मी फंड व्यवस्थापनाचा प्रवास सुरू केला.
एसबीआय (SBI) म्युच्युअल फंडमध्ये काम करत असताना एका महत्त्वाच्या टपप्यावर माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, मी अनेक फंडांचे निधी व्यवस्थापन आणि देखरेख करण्याची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा २००८ मध्ये, मिरे म्युच्युअल फंडने भारतात प्रवेश केला आणि त्यांना ‘हेड ऑफ इक्विटी’ची (Head of Equity) गरज होती, तेव्हा एप्रिल महिन्यात मी मिराई म्युच्युअल फंडात दाखल झालो. सेबीकडून (SEBI) म्युच्युअल फंडाचा परवाना मिळवण्याची प्राथमिक प्रक्रिया, टीमची नियुक्ती, गुंतवणुकीचे नियमन करणारे मॅन्युअल (investment manual) तयार करणे आणि एनएफओ (NFOs) लाँच करणे यांसारख्या गोष्टींमध्ये मी सहभागी होतो; या सर्व प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आल्या. वाजवी मूल्यांकनावर (valuations) समभाग खरेदी करणे आणि दीर्घकालीन वाढीची शक्यता असणाऱ्या कंपन्या निवडणे यांसारख्या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे मिराईच्या यशात मी माझे योगदान दिले. मिराईमध्ये जवळपास दहा वर्षे काम केल्यानंतर, मला टाटा (Tata) म्युच्युअल फंडमध्ये ‘सीआयओ-इक्विटी’ (CIO–Equity) म्हणून रुजू होण्याची संधी मिळाली. माझ्या कारकिर्दीतील प्रत्येक जबाबदारी वेगळी आणि आव्हानात्मक राहिली आहे. टाटा म्युच्युअल फंडमध्ये मी ‘कॅश फ्लो’वर आधारित, दीर्घकालीन विचार आणि व्यवसाय विस्तारास वाव असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थात्मक गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनाचा अवलंब केला. त्यानंतर, डीएसपी (DSP) म्युच्युअल फंडमध्ये, माझ्या ‘मूल्य-आधारित’ (value-based) कार्यपद्धतीची सांगड तिथल्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या ‘वृद्धी केंद्रित’ (growth-oriented) विचारसरणीशी सांगड घातल्यामुळे योग्य ते परिणाम साधण्यास मदत झाली. मी जुलै २०२० मध्ये एचडीएफसी (HDFC) म्युच्युअल फंडमध्ये रुजू झालो. एचडीएफसी म्युच्युअल फंड ही स्वतःच एक मोठी संस्था आहे—एक अत्यंत प्रतिष्ठित गुंतवणूक संस्था. विविध प्रकारच्या गुंतवणूक धोरणांचे (investment mandates) नेतृत्व आणि मार्गदर्शन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे; यासाठी शिस्तबद्ध कार्यपद्धती, योग्य निर्णयक्षमता आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची सातत्यपूर्ण वृत्ती आवश्यक असते. अंतर्गत संशोधनाचा भक्कम आधार आणि माझ्या अनुभवाची शिदोरी यामुळे हा प्रवास अत्यंत रंजक आणि समाधानकारक ठरत आहे.
एका फंड मॅनेजरच्या दृशिकोनातून तुम्ही सध्याच्या बाजाराकडे कसं बघता?
कोटक सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, मोठ्या घसरणीनंतर लार्जकॅप शेअर्स १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत जवळपास ८% सवलतीवर आहेत आणि आर्थिक वर्ष २०२८ च्या अपेक्षित प्रतिसमभाग मिळकतीच्या आधारावर अर्निंग्स यील्ड ५.९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोनासाठी ही एक आकर्षक पातळी असल्याचे दिसते. तथापि, सध्या, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स अजूनही चढ्या मुल्यांकनावर व्यवहार होत आहेत. सापेक्ष दृष्ट्या, स्मॉलकॅपचे मुल्यांकन मिडकॅपपेक्षा कमी जोखीम असलेले आहे. तथापि, महागाईच्या परिस्थितीत, सामान्यतः कंपन्यांच्या भांडवली गुंतवणुकीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत, जे मध्यम मुदतीसाठी स्मॉलकॅप्स साठी शुभ संकेत असू शकतात. बाजारातील सर्वात मोठा धोका म्हणजे तेल आणि वायूच्या किमती आणि एल-निनोमुळे (जरी सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी) निर्माण होणारा महागाईचा दबाव. अनेक आयपीओ/ओएफएस/सरकारी निर्गुंतवणुकीमुळे रोकड सुलभता शोषली जात आहे.
इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात?
बाजार कठोरपणे शिकवतो आणि नेहमीच काही घटक नियंत्रणाबाहेर असतात. आपण संयम बाळगणे आणि गुंतवणुकीच्या मूळ तत्त्वांना चिकटून राहणे आणि कमाईच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
तुम्ही म्युच्युअल फंड युनिट धारकांना काय संदेश द्याल?
संपत्ती निर्माण करण्यासाठी विश्वास आणि संयम महत्त्वाचे आहेत. इक्विटी या मालमत्ता वर्गाकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि मालमत्ता वाटपावर लक्ष केंद्रित करा.
संकलन : वसंत कुलकर्णी
संकल्पना : गौरव मुठे
