How To Build Wealth : मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगला पगार किंवा जास्त उत्पन्नच असायला हवे असं काही नाही. आर्थिक शिस्त आणि योग्य गुंतवणुकीच्या नियोजनातून कमी उत्पन्नातूनही मोठा निधी जमा करता येणे आता शक्य आहे. पुण्यातील ३२ वर्षीय सुधीर दंडोति यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे. पुण्यातील राहत्या घरासह सुधीर यांनी आज सुमारे ९ कोटी रुपयांची संपत्ती उभी केली आहे.
सुधीर यांचा पोर्टफोलिओ कसा आहे?
सुधीर स्वतःला हुशार गुंतवणूकदार मानत नाहीत. उलट त्यांनी एका मुलाखतीत अशी गोष्ट सांगितली, जी सांगायला अनेकांना संकोच वाटेल. सुधीर म्हणतात, “जर तुम्ही माझी स्वतःची गुंतवणूक वजा केली, तर माझे रिटर्न्स अतिशय सामान्य आहेत.” तरीही इतकी मोठी संपत्ती कशी निर्माण केली? त्यांच्या आर्थिक प्रवासातून ७ महत्त्वाचे धडे जाणून घेऊ.
रिटर्न्सपेक्षा ‘गुंतवणूक वाढवण्यावर’ लक्ष केंद्रित करा
आपल्याकडे गुंतवणूक म्हटलं की परतावा किती? कोणता म्युच्युअल फंड सर्वोत्तम आहे? कोणत्या फंडने २०% परतावा दिला? मी या फंडमधून पैसे काढून दुसऱ्या फंडमध्ये टाकू का? कोणता वर्ग पुढे उत्तम कामगिरी करेल? असे प्रश्न उपस्थित केले जातात. सुधीर देखील सुरुवातीला हेच करत होते. ते म्युच्युअल फंडचे रॅंकिंग तपासून १ नंबर किंवा २ नंबरचा फंड शोधण्याचा प्रयत्न करायचे. पण नंतर त्यांनी रॅंकिंगला जास्त महत्त्व देणे बंद केले आणि गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. ते सध्या एसआयपीद्वारे दरमहा सुमारे दीड लाख रुपये गुंतवतात. याचा अर्थ बाजारातील परतावा मिळण्यापूर्वीच दरवर्षी १८ लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये जात आहेत. ज्या व्यक्तीचा कॉर्पस अजून तयार होतोय, त्याच्यासाठी हा एक खूप मोठा धडा आहे.
उत्पन्न वाढीसोबत गुंतवणुकीत भर
सुधीर यांनी ही संपत्ती केवळ काटकसरीने उभी केली आहे, असं अजिबात नाही. त्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झालेली आहे. त्यांनी २०१७ मध्ये सुमारे ४.५ लाख रुपयांच्या पॅकेजने करिअरची सुरुवात केली होती. २०२० पर्यंत ते वाढून १८ लाख झाले आणि २०२२ मध्ये ते पुण्याला आले तेव्हा त्यांचे पॅकेज सुमारे ४० लाख रुपये झाले. आज त्यांचे पॅकेज सुमारे ५२ लाख रुपये आहे. त्यांची पत्नीलाही चांगल्या पगाराची नोकरी आहे. अतिरिक्त उत्पन्नाचे काय करायचे, हा पर्याय सुधीर यांच्याकडे होता. ते अधिक महागडी गाडी खरेदी करू शकले असते किंवा दर दोन वर्षांनी राहणीमान उंचावू शकले असते. पण त्याऐवजी जास्तीत जास्त अतिरिक्त पैसा गुंतवणुकीत आणि होम लोन फेडण्यात गेला.
लाइफस्टाईल इन्फ्लेशन
जेव्हा जेव्हा पगार वाढला, तेव्हा आपल्याला ताबडतोब गाडी, सुट्ट्या किंवा लाइफस्टाईल अपग्रेड करण्याची गरज आहे, असे सुधीर यांना कधीही वाटले नाही. ऐकायला हे सोपे वाटते, पण प्रत्यक्षात आणणे खूप कठीण आहे. कारण, जसे उत्पन्न वाढते, तशी कालची लक्झरी आजची सामान्य गरज बनत जाते. सुधीर याला बळी पडले नाही. त्यांचा पगार वेगाने वाढला, पण खर्च त्या वेगाने वाढला नाही. त्यामुळे गुंतवणूक वाढली आणि मोठा कॉर्पस तयार होण्यात मदत झाली.
गुंतवणुकीतील शिस्त
करोनाच्या घसरणीतही सुधीर यांनी आपल्या SIP थांबवल्या नाहीत की म्युच्युअल फंडमधून एक रुपयाही काढला नाही. बाजार चांगला चालला असताना हे बोलायला सोपे वाटते. पण, घसरणीच्या काळात संयमाची परीक्षा असते. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की यशस्वी होण्यासाठी बाजारात कधी प्रवेश करावा आणि कधी बाहेर पडावे हे माहीत असणे गरजेचे आहे. सुधीर यांनी यापैकी काहीही केले नाही. ते फक्त गुंतवणूक करत राहिले. त्यांचा गुंतवणुकीचा काळ १५ ते २० वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील १५ वर्षांच्या पैशांवर बाजारातील वाईट सहा महिन्यांचा प्रभाव का पडू द्यावा? असं त्यांना वाटतं.
कमी हुशारीचा पण मोठ्या योगदानाचा पोर्टफोलिओ
सुधीर यांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ परिपूर्ण नाही. ते विविध श्रेणींमधील तब्बल ११ फंड्समध्ये गुंतवणूक करतात. हा पोर्टफोलिओ ओव्हर-डाइव्हर्सिफाइड आहे. पण, तरीही एका अपूर्ण पोर्टफोलिओसह त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये २.५६ कोटी रुपये कसे जमा केले? कारण त्या पोर्टफोलिओमध्ये सातत्याने पैसा येत राहिला. याचा अर्थ फंड निवड किंवा मालमत्ता वाटप महत्त्वाचे नाही असा होत नाही. पण, जर तुमचा कॉर्पस लहान असेल, तर अतिरिक्त १ टक्का परतावा देणारा फंड शोधण्यापेक्षा तुमची मासिक गुंतवणूक वाढवणे अधिक प्रभावी ठरू शकते.
उत्पन्नाचे मालमत्तेत रूपांतर करणे म्हणजे संपत्ती
सुधीर यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा शेवटी कुठल्या ना कुठल्या मालमत्तेत रूपांतरित झाला आहे.
- म्युच्युअल फंड: २.५६ कोटी रुपये
- सोने (SGB आणि भौतिक सोने) : ६४ लाख रुपये
- एफडी आणि बँक बॅलन्स : ५७ लाख रुपये
- शेअर्स : २३ लाख रुपये
- पीपीएफ आणि ईपीएफ : २४ लाख रुपये
- पुणे मालमत्ता : ४.५-४.७ कोटी रुपये
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे निवृत्ती नव्हे!
सुधीर यांना वयाच्या ४० व्या वर्षी २० ते २५ कोटी रुपयांची संपत्ती उभी करायची आहे. ते याला ‘निवृत्ती’ म्हणत नाहीत. कारण, त्यांना यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता काम बंद असा होत नाही. तर तुम्हाला आवडत्या श्रेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य असा होता.
