लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे आणि निश्चित मुदतपूर्ती कालावधी डोळ्यांसमोर ठेवून ‘लाइफ सायकल फंड २०३१’, ‘लाइफ सायकल फंड २०३६’ आणि ‘लाइफ सायकल फंड २०४१’ या तीन नव्या योजनांची घोषणा केली आहे. या सर्व योजनांसाठी नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) कालावधी सुरू झाला असून, गुंतवणूकदारांना ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

अनुक्रमे पाच, १० आणि १५ वर्षे अशी या योजनांची विशिष्ट मुदत असली तरी कायम गुंतवणुकीसाठी खुल्या (ओपन एंडेड) असलेल्या या योजना आहेत. हे फंड पूर्वनिर्धारित ‘ग्लाइड पाथ’ धोरणावर आधारित आहेत. म्हणजेच योजनेच्या सुरुवातीच्या वर्षांत दीर्घकालीन भांडवली वाढीसाठी समभागांमधील (इक्विटी) वाटप लक्षणीयरीत्या जास्त असेल. मुदतपूर्तीची (मॅच्युरिटी) तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी इक्विटीमधील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने कमी करून डेट (रोखे) आणि मनी मार्केट अशा स्थिर उत्पन्न साधनांमधील गुंतवणूक वाढवली जाईल.

या योजना इक्विटी, डेट साधने, सोने व चांदीचे ईटीएफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्सच्या युनिट्समध्ये नियमानुसार गुंतवणूक करतील. ‘आमचे दीर्घकालीन गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि ‘हायब्रिड’ फंड व्यवस्थापनातील नैपुण्य यांचा संगम या लाइफसायकल फंड्समध्ये साधला गेला आहे. गुंतवणूकदार जसजसे आपल्या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचतात, तसतसा गुंतवणुकीचा दृष्टिकोन अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळत जातो. निश्चित उद्दिष्टे, गतिमान मालमत्ता वाटप आणि लवचिकता यांचा हा मिलाफ गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओसाठी एक उत्तम पर्याय ठरेल, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन यांनी सांगितले.

लाइफ सायकल फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाच, १० आणि १५ वर्षांच्या कालावधीचे पर्याय उपलब्ध असल्याने मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्तीचे नियोजन अशा विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी हे फंड उपयुक्त ठरतात.