Investment Strategy After 40 : कमी उत्पन्नात मोठा निधी उभा करायचा असेल तर आर्थिक सल्लागार लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देतात. कारण, बाजारात जितका काळ पैसा राहील, तेवढा त्याला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मात्र, अल्प उत्पन्न, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे अनेकजणांना गुंतवणूक सुरू करण्यास उशीर होतो. मात्र, उशीरा गुंतवणूक सुरू केली तर मोठा निधी उभारता येत नाही, असाही एक गैरसमज गुंतवणूकदारांमध्ये पाहायला मिळतो. अनेकजण विचार करतात की, आपण लवकर गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी होती. पण, आर्थिक तज्ज्ञांच्या मते हा विचार चुकीचा आहे. वयाचे ४० ते ६० हे वर्ष बहुतांश नोकरदार किंवा व्यावसायिकांसाठी सर्वाधिक कमाईचे मानले जातात. निवृत्तीसाठी अजूनही १५ ते २० वर्षांचा कालावधी हातात असतो. त्यामुळे योग्य नियोजन, आर्थिक शिस्त आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास आजही मोठा निधी उभारणे सहज शक्य आहे.
गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी बजेट मांडा
गुंतवणुकीला सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब मांडणे गरजेचे आहे. घरभाडे, ईएमआय आणि किराणा यांसारख्या सर्व आवश्यक आणि निश्चित खर्चांची यादी तयार करा. हे सर्व खर्च वजा केल्यानंतर तुम्ही किती गुंतवणूक करू शकता, याचे चित्र स्पष्ट होईल.
निवृत्ती निधीला सर्वोच्च प्राधान्य
गुंतवणूक सुरू करताना निवृत्ती निधीला प्राधान्य द्या. कारण, मुलांचे शिक्षण, घर आदीसाठी बँकांकडून कर्ज घेता येऊ शकते. मात्र, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कोणतीही बँक कर्ज देत नाही. त्यामुळे चाळीशीनंतर गुंतवणुकीचा मोठा वाटा हा स्वतःच्या निवृत्ती निधीसाठी गुंतवणे शहाणपणाचे आहे.
‘एसआयपी’चा मार्ग धरा
अनेक जण शेअर बाजार खाली आल्यावर पैसे लावू असा विचार करत वाट पाहत बसतात. बाजारात योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा म्युच्युअल फंडांत मासिक ‘एसआयपी’ करुन सुरू करा. लक्षात ठेवा शेअर बाजारात तुमचा जेवढा जास्त काळ तुमचा पैसा राहील, तेवढा चक्रवाढीचा फायदा होऊन दीर्घकाळात मोठी निधी उभारण्यात मदत होईल.
इक्विटी आणि डेटचा समतोल साधा
गुंतवणूक करताना दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा. बफे म्हणतात की सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेऊ नये. तसेच गुंतवणूक करताना सर्व पैसे एकाच मालमत्ता वर्गात गुंतवू नये. महागाईवर मात करण्यासाठी इक्विटीमधील गुंतवणूक अनिवार्य आहे. अर्थात, सर्व अंडी एकाच टोपलीत न ठेवता आपल्या जोखीम क्षमतेनुसार इक्विटी, डेट फंड आणि मुदत ठेवी यांसारख्या पर्यायांमध्ये योग्य समतोल साधणे आवश्यक आहे.
आपत्कालीन निधी तयार ठेवा
या वयात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर असल्याने किमान ६ महिन्यांचा घरखर्च निघेल एवढा आपत्कालीन निधी तयार ठेवा. यासोबतच पुरेसा आरोग्य विमा आणि टर्म प्लॅन घेणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून वैद्यकीय संकट किंवा उत्पन्न अचानक बंद झाल्यास मूळ गुंतवणुकीला हात लावावा लागणार नाही.
दरवर्षी एसआयपीमध्ये करा ‘स्टेप-अप’
गुंतवणूक सुरू केल्यानंतर दरवर्षी त्याचा आढावा घ्यायला विसरू नका. सोबतच दरवर्षी मिळणारी पगारवाढ किंवा बोनसचा वापर करून तुमच्या एसआयपीच्या रकमेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ करा. दरवर्षी केलेली ही छोटीशी वाढ पुढील १० ते १५ वर्षांत तुमच्या निधीमध्ये मोठी वाढ करू शकते.
