Kotak Nifty Realty Index Fund NFO : कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने ‘कोटक निफ्टी रिॲल्टी इंडेक्स फंड’ ही नवीन म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ही मुदत-मुक्त योजना असून, चढ-उतारातील नफ्या-तोट्यातील किरकोळ फरकाच्या अधीन राहून ‘निफ्टी रिॲल्टी इंडेक्स’चा मागोवा घेत वाटचाल करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या नवीन फंड ऑफरचा (एनएफओ) कालावधी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाला असून तो येत्या ९ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद होणार आहे.
शहरीकरण, वाढणारे उत्पन्न, पायाभूत सुविधांचा विकास आणि रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, २०१६ (रेरा) सारख्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे वाढती औपचारिकरण यासारख्या संरचनात्मक बदलांमुळे भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राला व्यापक लाभ होत आहे. ही संधी निवासी, व्यावसायिक, किरकोळ विक्री, आदरातिथ्य आणि औद्योगिक गोदाम या विभागांमध्ये पसरलेली आहे.
कोटक निफ्टी रिॲल्टी इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना ‘निफ्टी रिॲल्टी इंडेक्स’शी जोडलेल्या पॅसिव्ह गुंतवणूक धोरणाद्वारे भारतातील सूचीबद्ध रिअल इस्टेट क्षेत्रात सहभागी होण्याची संधी देतो. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, या इंडेक्समध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केलेले १० रिअल इस्टेट समभाग समाविष्ट आहेत आणि त्याचे दर सहा महिन्यांनी पुनर्संतुलन केले जाते.
कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह म्हणाले, ‘भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र असंघटीत रुपातून अधिक औपचारिक आणि संघटीत उद्योगाकडे असा संरचनात्मक बदल अनुभवत आहे. ग्राहक, कर्ज देणाऱ्या बँका आणि जमीन मालक वाढत्या प्रमाणात मजबूत आर्थिक आणि प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या प्रस्थापित विकासकांना पसंती देत आहेत. वाढती खरेदी शक्ती आणि दर्जेदार बांधकामांची मागणी या ट्रेंडला आणखी बळकट करू शकते. कोटक निफ्टी रिॲल्टी इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना पॅसिव्ह धोरणाद्वारे या विकसनशील संधीमध्ये सहभागी होण्याचा सोपा परंतु शिस्तबद्ध मार्ग देतो.’
कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे फंड मॅनेजर सतीश दोंडापती म्हणाले, ‘प्रत्येक रिअल इस्टेट कंपनीमध्ये वैयक्तिकरित्या गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना या क्षेत्रातील चढउतार आणि समभाग-संबंधित जोखीम यांचा सामना करावा लागतो. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, निफ्टी रिॲल्टी इंडेक्स एका पारदर्शक, नियम-आधारित पद्धतीनुसार १० सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपन्यांच्या समूहामध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो.* हा फंड या निर्देशाकाची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना सूचीबद्ध रिअल इस्टेट क्षेत्रात सहभागी होण्यासाठी एक सरळ आणि अप्रत्यक्ष (पॅसिव्ह) मार्ग मिळतो.’
