Mutual Fund Investment Advice : भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी नेमकी कोणती रणनीती आखावी, याबाबत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक मितूल कलवडिया यांनी मार्गदर्शन केले आहे. यामध्ये पुढील एका वर्षात भारतीय शेअर बाजारात काय घडू शकते? कुठे गुंतवणूक सुरक्षित राहील याचा आढावा घेण्यात आला आहे.

आमच्या वाचकांना तुमची थोडक्यात ओळख करुन द्या.

मी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट)ची पात्रता प्राप्त केल्यानंतर माझी पहिली नोकरी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडातमध्ये होती. मला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात दाखल होऊन आता २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात मी विविध भूमिका पार पाडल्या समभाग संशोधकापासून सुरुवात करून सहनिधी व्यवस्थापक, निधी व्यवस्थापक आणि आता वरिष्ठ निधी व्यवस्थापकापर्यंतचा माझा प्रवास झाला आहे. मागील २० वर्षांत मी विविध फंडांचे निधी व्यवस्थापन केले आहे. “मी ‘प्युअर इक्विटी’ फंड, ‘हायब्रिड’ फंड आणि एसआयएफ अशा विविध प्रकारच्या फंडांचे व्यवस्थापन केले आहे; एसआयएफ हा एक नवीन प्रकार आहे. थोडक्यात सांगायचे तर, मी इक्विटी, हायब्रिड आणि एसआयएफ मिळून ७० हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन करतो.

एक निधी व्यवस्थापक म्हणून सध्याच्या बाजाराकडे तुम्ही कसे पाहता?

बाजाराच्या दृष्टीने काही सकारात्मक बाबी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ‘अर्निंग्ज ग्रोथ’ (कंपन्यांच्या प्रति समभाग कमाईतील वाढ). कंपन्यांची कमाई चांगली आणि भरभक्कम वाढत आहे; त्यात या तिमाहीत सुधारणा झालेली दिसत आहे. ती वेगाने वाढत आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. ही वाढ सुरू राहील. कच्च्या तेलाच्या किमती सहिष्णुतेपेक्षा जास्त वाढल्याने कमाईतील वाढीचा वेग थोडा मंदावू शकतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की बाजार पूर्णपणे कोसळेल किंवा परिस्थिती खूपच खराब होईल; स्थूल आर्थिक (मॅक्रो) परिस्थिती फारशी वाईट नाही. ही एक सकारात्मक बाजू झाली. दुसरीकडे, काही नकारात्मक बाबीही आहेत.

पहिली नकारात्मक गोष्ट म्हणजे बाजारात प्राथमिक विक्रीतून होणारा शेअर्सचा पुरवठा खूप जास्त आहे. अनेक आयपीओ येत आहेत, संस्थात्मक गुंतवणूकदार आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी बाजारात विक्री करत आहेत, सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांकडून भांडवल उभारणी (क्यूआयपी) सुरू आहे. नवीन कंपन्या सूचीबद्ध होत आहेत. या सर्व गोष्टींमुळे बाजारातील शेअर्सचा पुरवठा वाढला आहे, ज्यामुळे बाजाराच्या तेजीवर मर्यादा येत आहेत.

तिसरी गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. त्या कशा असतील किंवा भविष्यात काय घडेल, हे सांगणे कठीण आहे, कारण कच्च्या तेलाच्या किमतींचा अंदाज वर्तवणे निव्वळ असंभव असते. त्यामुळे, कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता दिसून येईल आणि परिणामी, बाजारातही काही प्रमाणात अस्थिरता दिसून येऊ शकते. आमच्या मते, पुढील एक वर्ष बाजार अस्थिर राहील. बाजारात घसरणही पाहायला मिळेल आणि पुन्हा तेजीही येईल; म्हणजे बाजार केवळ एका दिशेने (खाली) जाणार नाही. काही सकारात्मक घडामोडी बाजाराला वर नेतील, तर काही कारणांमुळे (उदा. नवीन शेअर्सची मोठी उपलब्धता) बाजार खालीही येऊ शकतो. समजा, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे बाजार खाली आला, पण नंतर काही सकारात्मक घडले किंवा तेलाच्या किमती कमी झाल्या, तर बाजार पुन्हा वर जाईल. थोडक्यात, बाजार सतत वर-खाली होत राहील. आमचा दृष्टिकोन असा आहे की, पुढील वर्षभर बाजारात टोकाची अस्थिरता असेल आणि एकूण परतावा मध्यम स्वरूपाचा मिळेल.

बाजाराकडून तुम्ही काय शिकलात किंवा बाजाराने तुम्हाला काय शिकवले?

बाजाराने मला हे शिकवले आहे की, पैसे कमवण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज तर असतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमचे आर्थिक वर्तन कसे आहे हे महत्वाचे ठरते. चांगले आर्थिक वर्तन म्हणजे जेव्हा गोष्टी स्वस्त असतात (परतावा आकर्षक नसतो) तेव्हा त्या खरेदी करण्यात कोणालाही रस नसतो. या उलट तेव्हा खरेदी (गुंतवणूक) करणे; आणि जेव्हा गोष्टी खूप महाग होतात,(परतावा आकर्षक दिसतो) तेव्हा त्या विकणे. अर्थात, मुलभूत समभाग संशोधन करणे यांसारख्या इतर गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच, पण तुमचा स्वभाव तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळवून देण्यात मदत करतो. माझी सर्वात मोठी शिकवण ही आहे की, बाजारातील अस्थिरता ही गुंतवणूकदारासाठी अडथळा नसून एक मित्र आहे. मी ‘मित्र’ असे म्हणतोय, कारण दीर्घकाळात एका दिशेने चालणाऱ्या (वर जाणाऱ्या) बाजारापेक्षा अस्थिर बाजार गुंतवणूकदाराचा परतावा वाढवण्यास मदत करतो.

भविष्यातील बाजाराची अपेक्षित वाटचाल पाहता, तुमचा गुंतवणूकदारांना काय सल्ला असेल?

अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड आणि एसआयएफ उत्पादने योग्य आहेत. बाजारपेठ अस्थिर राहणार आहे, हे लक्षात घेता बाजारपेठेतील अस्थिरता परताव्याचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असेल. मी आपल्याला कोणते फंड गट असावेत हे नमूद करतो. एग्रेसीव्ह हायब्रिड, बॅलन्स्ड ॲडव्हांटेज आणि आर्बिट्राज फंड आणि एसआयएफ मध्ये ‘इक्विटी लाँग-शॉर्ट’ आणि हायब्रिड एसआयएफ असे दोन प्रकाराचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. याव्यतिरिक्त, इक्विटी फंडांमध्ये ‘डिव्हिडंड यील्ड फंड’ हा एक चांगला पर्याय आहे. एसआयएफ बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही एक नवीन गुंतवणूक साधन आहे. ज्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ मोठा आहे आणि ज्यांना जोखम घेण्याची क्षमता जास्त आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ पारंपारिक इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा, दीर्घकाळात अशा प्रकारची उत्पादने त्यांच्यासाठी अधिक सोयीची ठरू शकतात.
संकलन : वसंत कुलकर्णी