Mutual Fund Investment Guide And Expert Market Insights: अलिकडील काळात गुंतवणुकीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससारखे पर्याय उपलब्ध झाल्याने म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीच्या योजना गावा-खेड्यांपर्यंत पोहचल्या आहेत. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागली आहे. गुंतवणूकदारांची संख्याही मोठ्या प्रमणात वाढली आहे. असे असले तरी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना नवख्या गुंतवणूकदारांकडून नकळत काही चुका होतात. ज्याचा फटका त्यांना भविष्यात बसतो.

दरम्यान बिझनेस टुडेच्या एका कार्यक्रमात व्हॅल्यू रिसर्चचे सीईओ धीरेंद्र कुमार यांनी नवख्या गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना होणाऱ्या चुकांवर प्रकाश टाकला आहे.

धिरेंद्र कुमार यांनी नमूद केले की, जे लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू इच्छितात, त्यांच्याकडून ‘योग्य वेळेची’ वाट पाहणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. बाजारातील चढ-उतार, संभाव्य घसरण किंवा ‘सर्वोत्तम’ फंडाचा शोध यांसारख्या गोष्टींचा अतिविचार केल्यामुळे अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक सुरूच करू शकत नाहीत. गुंतवणुकीत यश मिळवण्याचा पहिला नियम म्हणजे लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे आणि सातत्याने गुंतवणूक करत राहणे, असे त्यांनी सांगितले.

व्हॅल्यू रिसर्चचे सीईओ धीरेंद्र कुमार २० ते ३० वयोगटातील तरुणांना सल्ला देताना म्हणाले की, तरुणांनी कमाई सुरू करताच गुंतवणुकीची सवय लावून घ्यावी. कारण बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा, गुंतवणुकीसाठी मिळणारा दीर्घकालीन कालावधी अधिक फायदेशीर ठरतो.

धीरेंद्र कुमार यांच्या मते, जे गुंतवणूकदार दरमहा ५००० ते १०००० रुपयांची बचत करतात, त्यांनी बाजारात होणाऱ्या पुढील घसरणीची किंवा मंदीची वाट पाहू नये. त्याऐवजी, लहान रकमेने सुरुवात करून SIP द्वारे गुंतवणूक सुरू ठेवावी.

‘स्मॉल-कॅप फंड्स’, ‘इंडेक्स फंड्स’ आणि ‘फ्लेक्सी-कॅप फंड्स’ हे नवख्या गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. पण, एखाद्या विशिष्ट फंडाची निवड करण्यापेक्षा गुंतवणुकीची सवय लावून घेण्यावर धीरेंद्र कुमार यांनी भर दिला आहे. किमान पहिल्या वर्षात बाजारातील दैनंदिन चढ-उतारांचा अतिविचार करणे किंवा परताव्याची चिंता करणे टाळावे, असे त्यांनी नमूद केले.

वयाच्या तिशीच्या उत्तरार्धात किंवा चाळीशीत असलेल्या आणि पहिल्यांदाच इक्विटी गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी त्यांनी संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला.

त्यांच्या मते, असे गुंतवणूकदार अनेकदा शेअर बाजारातील जोखमींबाबत सावध असतात. त्यामुळे, आक्रमक हायब्रीड फंड एक योग्य सुरुवात ठरू शकते. हे फंड इक्विटी आणि डेट या दोन्हींचे मिश्रण असतात, ज्यामुळे जोखीम नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांशी जुळवून घेण्यास वाव मिळतो.