Mutual Fund SIP Crorepati Calculator : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी उत्पन्नही लाखात हवे, असा बहुतेक लोकांचा समज आहे. मात्र, आर्थिक नियोजनात शिस्त आणि सातत्य असेल, तर दरमहा केवळ ३०,००० रुपये कमावणारी व्यक्ती देखील कोट्यधीश होऊ शकते. म्युच्युअल फंड एसआयपी आणि चक्रवाढ व्याजाच्या जोरावर १ कोटी रुपयांचा मोठा फंड कसा तयार करता येईल? याचं सोपं गणित समजून घ्या.

गुंतवणुकीचे ५०-३०-२० चे सूत्र

  • १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांनी ५०-३०-२० चे सोपे सूत्र सांगितले आहे.
  • ५०% रक्कम (१५,००० रुपये) : घरखर्च, किराणा आणि इतर अत्यंत आवश्यक गरजांसाठी.
  • ३०% रक्कम (९,००० रुपये) : कुटुंबाच्या सुख-सुविधा, फिरणे किंवा मनोरंजनावर खर्च करण्यासाठी.
  • २०% रक्कम (६,००० रुपये) : ही तुमची निव्वळ बचत असायला हवी. या बचतीमधील ५,००० रुपयांची रक्कम तुम्हाला दरमहा म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवायची आहे.

१ कोटी रुपयांचे समीकरण

दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळणारा चक्रवाढ व्याजाचा फायदा हा संपत्ती निर्मितीसाठी सर्वात मोठा घटक ठरतो. दरमहा ५,००० च्या एसआयपीवर परताव्याच्या दरानुसार तुम्हाला किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल ते पाहुयात.

मासिक गुंतवणूकअपेक्षित वार्षिक परतावा करोडपती बनण्याचा कालावधीतुमच्या खिशातून जमा होणारी रक्कम
५,०००१२%सुमारे २६ वर्षे१५.६ लाख
५,०००१५%अवघी २१ वर्षे१२.६ लाख


१५% परतावा मिळाल्यास २१ वर्षांत तुमच्या खिशातून फक्त १२.६ लाख रुपये गुंतवले जातील, तर उर्वरित सुमारे ८७.४ लाख रुपयांचा निधी हा केवळ नफा म्हणून तुमच्या खात्यात जमा झालेला असेल.

कमी कालावधीत मोठा निधी उभ्यारण्यासाठी ‘स्टेप-अप’चा बुस्टर

जर तुम्हाला १ कोटी रुपयांचे ध्येय अजून कमी कालावधीत गाठायचे असेल, तर ‘स्टेप-अप एसआयपी’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. नोकरीमध्ये दरवर्षी होणारी पगारवाढ लक्षात घेऊन दरवर्षी एसआयपीच्या रकमेत फक्त १० टक्के वाढ करायची असते. उदाहणार्थ पहिल्या वर्षी दरमहा ५,००० ची गुंतवणूक तुम्ही सुरू केली. दुसऱ्या वर्षी ही रक्कम १० टक्क्यांनी वाढवून दरमहा ५,५०० रुपये होईल. तर तिसऱ्या वर्षी ६,०५० रुपयांवर जाईल. वार्षिक सरासरी १२% परतावा गृहीत धरला, तरी या ‘स्टेप-अप’ पद्धतीमुळे तुम्ही अवघ्या १९ वर्षांत तुम्ही १ कोटी रुपयांचे मालक व्हाल.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.