Radhika Gupta Edelweiss SIP Investment : तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम गुंतवता, असा प्रश्न विचारला तर तुमचे उत्तर काय असेल? १० टक्के, २० टक्के फार काटकसर केली तर ५० टक्के. बरोबर ना? पण, ‘एडलवाइज म्युच्युअल फंड’च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता आपल्या करोत्तर पगाराच्या तब्बल ९० टक्के रक्कम एसआयपीद्वारे गुंतवतात. राधिका गुप्ता सांगतात, की एकेकाळी माझ्या हातात एक रुपयाही टीकत नव्हता, पगार आला की संपून जायचा. त्यांना ही बचतीची सवय कशी लागली? याचं गुपित राधिका यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले आहे.
‘कॉन्व्हर्सेशन विथ कुशल’ या पॉडकास्टमध्ये बोलताना गुप्ता यांनी आपल्या वैयक्तिक आर्थिक प्रवासाविषयी थक्क करणारी माहिती शेअर केली. एकेकाळी हातात एक रुपयाही न उरणारा त्यांचा बचत दर आज ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.
‘SIP म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिडक्टेड ॲट सोर्स’
जीवनाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हे सर्वात उत्तम साधन असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. “जेव्हा तुमचा पगार ५० किंवा १ लाख रुपये असतो, तेव्हा मिळणाऱ्या रकमेतून कर आधीच कापला जातो आणि तो टाळता येत नाही. एसआयपीकडेही तुम्ही याच दृष्टीने पाहिले पाहिजे. एसआयपी म्हणजे ‘इन्व्हेस्टमेंट डिडक्टेड ॲट सोर्स’ आहे. एसआयपीद्वारे पगार खात्यात जमा होताच स्वयंचलित पद्धतीने गुंतवूक केली जाईल. आधी पैसे खर्च करुन मग उर्वरित बचत ही चुकीची सवय मोडली जाईल” असे गुप्ता म्हणाल्या.
थेंबेथेंबे तळे साचे..
अनेकजण उत्पन्न कमी म्हणून गुंतवणुकीला सुरुवातच करत नाही. मात्र, आता १०० रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची सोय असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “जर तुमचे मासिक उत्पन्न ४५,००० हजार रुपये असेल, तर ९ ते १० हजार रुपये वाचवण्याचा प्रयत्न करा. तितके शक्य नसल्यास किमान ५,००० रुपयांपासून तरी नक्की सुरुवात करा.”
झिरो सेव्हिंग्स ते ९० टक्के एसआयपी!
आपला शून्यापासून ९० टक्के गुंतवणुकीपर्यंत झालेल्या प्रवास सांगताना राधिका म्हणाल्या, की “एक काळ असा होता जेव्हा माझ्या हातात कर कापून आल्यानंतर काहीच उरायचे नाही. मी शून्य टक्क्यांवरून १० टक्के, मग २० टक्के आणि आज माझ्या करोत्तर पगारातील जवळपास ९० टक्के रक्कम थेट एसआयपीमध्ये गुंतवली जाते.”
राधिका गुप्ता म्हणतात, तुम्ही जेवढं कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढा भविष्यात तुम्हाला अधिकचा फायदा मिळणार आहे. त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा अवघ्या सहा महिन्याचा असताना त्याच्या नावाने इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. मुलांच्या नावाने एसआयपी सुरू केल्यास पालक आपल्या दीर्घकालीन ध्येयांप्रती अधिक गंभीर आणि लक्ष केंद्रित होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पैसे साठवण्याच्या शर्यतीत आयुष्य जगायला विसरू नका!
उत्पन्नातील ९० टक्के रक्कम गुंतवत असतानाही त्यांनी एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. “म्युच्युअल फंड विक्री करणे हा माझा व्यवसाय आहे, तरी मी प्रत्येकाला हेच सांगते की स्वतःच्या कष्टाच्या कमाईचा आनंद घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. आयुष्य हे कोणाकडे सर्वात जास्त एनएव्ही आहे किंवा सर्वात जास्त संपत्ती आहे, याची शर्यत नाही; तर कोण सर्वात आनंदी आयुष्य जगले हाच खरा आयुष्याचा उद्देश आहे.”
