Radhika Gupta Investment Advice Marathi : गेल्या काही वर्षात भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात वैद्यकीय शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत अनेक कोर्सेसचा समावेश आहे. पूर्वी केवळ श्रीमंत लोक आपल्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवत होते. मात्र, आता मध्यवर्गीय पालकही यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एडलवाईज म्युच्युअल फंडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी पालकांना अत्यंत महत्त्वाचा आर्थिक सल्ला दिला आहे. ज्याद्वारे सामान्य कुटुंबही आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवू शकतात.

मुलगा ४ महिन्यांचा असल्यापासून त्याच्या नावावर गुंतवणूक

गुंतवणुकीचे महत्त्व सांगताना राधिका गुप्ता यांनी स्वतःचेच उदाहरण दिले, “माझा मुलगा अवघा ३ ते ४ महिन्यांचा असताना, मी आणि माझ्या पतीने त्याच्या नावाने प्रत्येकी ५०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली. पुढे जशी आमची मिळकत वाढली, तशी आम्ही या गुंतवणुकीची रक्कमही टप्प्याटप्प्याने वाढवत गेलो. आज त्याचे पोर्टफोलिओ रिटर्न्स पाहून मलाच आश्चर्य वाटते,” असा कौटुंबिक आर्थिक नियोजनाचा कानमंत्र राधिका गुप्ता यांनी दिला आहे.

आईपेक्षा मुलाचा पोर्टफोलिओ ठरला ‘सुपरहिट’!

राधिका गुप्ता यांनी सांगितले, की “२०२३ च्या तेजीच्या काळात माझ्या मुलाच्या पोर्टफोलिओने माझ्या स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणुकीपेक्षाही सरस कामगिरी केली. याचे कारण असे की, माझ्या मुलाच्या नावावर असलेल्या बहुतांश एसआयपी या ‘यूएस टेक फंड्स’ आणि ‘स्मॉल-कॅप फंड्स’मध्ये गुंतवल्या होत्या. याउलट, माझी स्वतःची गुंतवणूक प्रामुख्याने ‘बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड्स’मध्ये होती, जे तुलनेने सुरक्षित पण कमी परतावा देणारे असतात.”

पालकांसाठी राधिका गुप्ता यांचे ३ महत्त्वपूर्ण सल्ले

१. ‘उच्च शिक्षणा’साठी आजच पाऊल उचला

आजच्या काळात मुलांचे उच्च शिक्षण प्रचंड महाग झाले आहे. देशात किंवा परदेशात चांगल्या पदवीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोळ्यांसमोर ठेवून बाळ जन्माला आल्यापासूनच किंवा अत्यंत सुरुवातीच्या काळापासून दीर्घकालीन गुंतवणूक सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

२. ‘स्टेप-अप एसआयपी’चा वापर करा

सुरवातीला कमी रकमेने सुरुवात केली तरी चालेल, पण दरवर्षी जसे उत्पन्न वाढेल, तशी एसआयपीची रक्कम वाढवत जा (ज्याला आर्थिक भाषेत ‘स्टेप-अप एसआयपी’ म्हणतात). राधिका गुप्ता यांनीही ५० हजारांच्या मूळ रक्कमेत सातत्याने वाढ करत ही मोठी पुंजी निर्माण केली आहे.

३. चक्रवाढ व्याजाची जादू

“जेव्हा तुमचे मूल १६ किंवा १८ वर्षांचे होते आणि उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये पाऊल ठेवते, तेव्हा त्याच्या खात्यावर जमा झालेली २०-३० लाख किंवा २ कोटी रुपयांची रक्कम ही खूप मोठी आणि दिलासादायक वाटते. वेळेवर घेतलेला हा निर्णय पालकांना भविष्यातील मोठ्या आर्थिक विवंचनेतून वाचवू शकतो,” असे गुप्ता यांनी सांगितले.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.