Radhika Gupta Share Market : सध्याची शेअर बाजारातील घसरण पाहून अनेक गुंतवणूकदार चिंतेत असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र, “बाजारातील अल्पकालीन हालचालींना घाबरून न जाता आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी वेळ द्या,” असा मोलाचा सल्ला एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी दिला आहे. ‘एनडीटीव्ही प्रॉफिट इग्नाईट’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जेन-झीच्या गुंतवणुकीच्या पद्धतीवर भाष्य केलं.

‘जेन-झी’ गुंतवणुकीबाबत अधिक जागृत

जेन-झीच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीवर अनेकजण टीका करतात. पण, मला यात रस नसल्याचे राधिका गुप्ता यांनी स्पष्ट केले. या देशाने तरुण पिढीची ताकद पाहिली आहे. ही पिढी अत्यंत हुशार, आत्मविश्वासू असून लवकर गुंतवणूक सुरू करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. सध्याचे अनेक तरुण डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून म्युच्युअल फंड आणि थेट शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. मात्र, बाजारातील मंदी किंवा अस्थिरतेचा अनुभव या पिढीसाठी नवा असल्याने गुप्ता यांनी आपल्या अनुभवातून त्यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

‘मन शांती हवा असेल तर रोज न्यूज आणि पोर्टफोलिओ पाहणे बंद करा!’

आपल्या आयुष्यातील पहिल्या आर्थिक संकटाची आठवण सांगताना गुप्ता म्हणाल्या, “२००८ च्या जागतिक मंदीच्या वेळी मी पहिलं मोठं आर्थिक संकट पाहिलं, तेव्हा मला वाटलं होतं की आता सर्व काही संपलं. पण आज अनुभवानंतर बाजारातील घसरणीने मी विचलित होत नाही.” तुम्हाला मनाची शांती हवी असेल तर दररोज एनएव्ही किंवा पोर्टफोलिओ तपासण्यासाठी बातम्या पाहणे बंद करा. दररोज काय होतंय यापेक्षा लांबचा विचार करा. १० वर्षांच्या ‘एसआयपी’ने आजपर्यंत कोणाचेही नुकसान केलेले नाही, हा इतिहास आहे, असा कानमंत्र गुप्ता यांनी तरुणांना यावेळी दिला.

‘एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर जोखीम घ्यावी लागेल’

गुप्ता म्हणाल्या, की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असून तुम्ही सरतेशेवटी देशातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहात आणि भारतीय कंपन्यांची कमाई वाईट नाही. मुदत ठेवींपेक्षा ४ ते ५ टक्के जास्त परतावा हवा असेल तर बाजारातील अस्थिरता आणि जोखीम सहन करावीच लागते.

भारतात लवकरच असतील १०० अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या!

राधिका गुप्ता यांनी भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या भविष्यावर भाष्य केलं. त्यांनी सांगितले की, हा उद्योग सध्या एकत्रीकरणाच्या टप्प्यातून जात असून, मोठ्या कंपन्यांचा विस्तार अधिक होण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारतात १०० हून अधिक वेगवेगळ्या ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या’ अस्तित्वात येतील आणि हे लवकरच घडेल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.