PPFAS Mutual Fund Investment Tips : गेल्या २ वर्षांपासून शेअर बाजारात तीव्र चढउतार पाहायला मिळत आहे. अशा अस्थिर बाजारात आपले पैसे नेमके कुठे गुंतवावेत? असा प्रश्न अनेकांना सतावत आहेत. पीपीएफएएस (PPFAS) म्युच्युअल फंडात समभाग संशोधन प्रमुख आणि फंड व्यवस्थापक असलेले रौनक ओंकार यांनी बाजारातील चढ-उतारांवर आणि गुंतवणुकीच्या रणनीतीवर रोखठोक भाष्य केले आहे. वॉरेन बफे आणि पराग पारीख यांच्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या ओंकार यांनी भारतीय शेअर बाजारातील सध्याच्या मूल्यांकनावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
आयटी क्षेत्रातून फायनान्स जगतात पाऊल
मी तुम्हाला माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी गुंतवणुकीसाठी आदर्श समजली जाते तशी नाही. मी बी.एससी आयटी ही पदवी घेतली. बी. एससी आयटीच्या शेवटच्या वर्षापर्यंत मला गुंतवणूक या क्षेत्राबद्दल रस वाटायला लागलं होता. मग मी इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टिंग, वॉरेन बफे वैगरे या विषयांवर बरीच पुस्तके वाचत होतो. वॉरेन बफेचं पहिलं पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं आणि मला असं एकदम कौतुक वाटलं की, या माणसाने एवढं मोठं यश केवळ गुंतवणूक या क्षेत्रात मिळविले. तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. मग हळूहळू मी गंभीरपणे या क्षेत्राकडे बघायला सुरवात केली. त्याच्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षात मला वाटायला लागलं की, मला आयटीमध्ये करिअर करण्यात रस नाही. समभाग संशोधन गुंतवणूक व्यवस्थापन यात मला रस आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई गाठली. तिथं समभाग संशोधन आणि गुंतवणूक व्यवस्थापनयात करिअर करण्यासाठी ‘फायनान्स’ या विषयात मुंबई विद्यापीठातून एमबीए केलं. सीएफए करता आलं असतं पण त्यावेळेला सीएफएला आजच्या इतक वलय नव्हत. साहजिक एमबीए करणं हे तर्काला धरून होतं. एमबीए फायनान्स चालू करतानाच दोन वर्षांच्यामध्ये जी इंटर्नशिप असते, ती इंटर्नशिप २००८ मध्ये मला मिळाली पीपीएफएएस (पराग पारीख फायनॅशिअल सर्व्हिसेस) मध्ये. आणि तेव्हा इथून माझा गुंतवणूक आणि समभाग संशोधन याचा प्रवास सुरु झाला. इथे दाखल होण्याआधी मी पराग पारीख यांचे वर्तमान पत्रात प्रसिद्ध होणारे लेख वाचत होतो. या लेखांच पुस्तक प्रसिद्ध झाल आहे. ‘स्टॉक्स टू रिचेस’, हे जे सगळ्यात पहिलं पुस्तक जे होतं, ते मी वाचलं होतं. आणि मला असं वाटायला लागल की इथे सुद्धा एक ‘व्हॅल्यू सिस्टीम’ आहे. ही विचारसरणी आचरणात आणणारे भारतात खूप कमी लोकं आहेत. त्यावेळेला मी पीपीएफएएसमध्ये अर्ज केला आणि नशिबाने मला इंटर्नशिप पण मिळून गेली. तर, तेव्हापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे.
एक फंड मॅनेजर तुम्ही सध्याच्या बाजाराकडे कसं बघता?
तुमच्या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. मी व्हॅल्यु इंवेस्टिंगच्या दृष्टीकोनातून सद्य स्थितीकडे कसे पाहतो ते सांगतो. गेले दोन वर्ष निर्देशांक एका पट्यात (निफ्टी २२०००-२६०००) फिरत आहे. करोनानंतर बाजार खूपच वेगाने वरती गेला होता. त्यामुळे असं झालेलं आहे की दोन प्रकारचे गुंतवणूकदार आज बाजारात दिसत आहेत. जे कोविडच्या आधीपासून गुंतवणूक करत आहेत, आणि जे लोक कोविड पश्चात बाजारात आले आहेत. ज्या लोकांनी कोविड नंतर गुंतवणुकीला सुरवात केली, त्यांच्या अपेक्षा जर बघितल्या, तर त्या आधीपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपेक्षा खूपच जास्त आहेत. जे लोक ‘लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत, त्यांना माहिती असते की सायकल असते, कधीतरी मार्केट खूपच एका पद्धतीने वर जातं, कधीतरी खूपच खाली जातं. लोकांना ते माहिती आहे, ते लोक थोडेसे सावध आहेत. आम्ही (फंड घराणे) जेव्हा अचानक बाजार वर जातो तेव्हा नफा वसुली करून ‘कॅश’वर बसतो. आणि सामन्य गुंतवणूकदार नेमके आधीचा परतावा (नफा) बघून त्यावेळी नव्याने गुंतवणूक करतात. व्हॅल्युएशन जेव्हा जास्त असते तेव्हा परतावा पाहून पैसे लावतात. एकदम सगळे पैसे गुंतवणे हे बरोबर नाही. त्याच्यात जोखीम जास्त असते. आणि मार्केट करेक्ट होण्याचा (घसरण्याचा) धोका जास्त असतो. आमच्या दृष्टीकोनातून म्हणायचं झालं, तर व्हॅल्युएशन जेव्हा दोन वर्षापूर्वी खूप जास्त होते, तेव्हा आम्ही जास्त कॅशवर बसलो होतो. ही कॅश म्हणजे ही रक्कम बँकेत नसते . ही रक्कम मनी मार्केट रिटर्न्स म्हणजे ५.५ टक्के ते ६.५ टक्के दरम्यान व्याज कमावत असते. आम्ही ही रक्कम बाजारात (इक्विटी) मध्ये गुंतवले नव्हते. कारण आम्हाला वाटते की व्हॅल्युएशन खूपच जास्त होते. आता दोन वर्षांनी जर आपण बघितलं, तर व्हॅल्युएशन जरा बऱ्यापैकी कमी झालेत बऱ्याच कंपनीचे. खूपच प्रति समभाग मिळकत (अर्निंग ग्रोथ) पण पण आलेली आहे, त्यामुळे थोडंशी गुंतवणूक केली. अजूनही मुल्यांकन महाग आहे. असे नसते की सकाळी उठल्यावर मी आज या कंपन्यांत गुंतवणूक करणार. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीची संधी असते त्या वेळी आम्ही गुंतवणूक करतो. तौलनिक मूल्यांकनाचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय होत असतो.
इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात?
बाजार हा कडक शिक्षक आहे. आपली शिकण्याची तयारी असेल तर बाजार रोज काही ना काही शिकवत असतो. जितका तुम्ही दुराचा विचार कराल तितके तुमचे बाजारा विषयक अंदाज बरोबर येतील. उद्याचे अंदाज कदाचित चुकतील परंतु ३ ते ५ वर्षाचे अंदाज चुकण्याचे प्रमाण उद्याच्या अंदाजा पेक्षा जास्त असेल. बाजार जितके लांबचा विचार कराल तितके बाजार कौतुक करेल. उद्याचा अंदाज (ट्रेडिंगसाठी) अचूक येण्यासाठी तुम्हाला जितकी माहिती आवश्यक आहे, तितकी माहिती मिळविणे अशक्य आहे. एखाद्या कंपनीचा नफा पुढील तिमाहीत किती असेल याचा अंदाज कदाचित चुकेल. परंतु दोन वर्षांनी नफा किती असेल या अंदाजाच्या जवळ तुम्ही जावू शकता. कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा हेच दिसून येते. कंपनी व्यवस्थापन जितका दुराचा विकार करतात त्यांना नेहमीच फायदा झाला आहे ‘प्रेडीक्टेबीलीटी हे महत्वाची असते. परंतु, अनेकदा व्यावसायिक व्यवस्थापन आणि कौटुंबिक व्यवस्थापन यात हाच फरक आहे एकदा उद्योग क्षेत्राचा नफा वाढतो परंतु त्या प्रमाणात त्या उद्योग क्षेत्रातील एखाद्या कंपनीचा नफा त्या प्रमणात वादात नाही. याचे कारण ती कंपनी चालवणाऱ्या लोकांच्यात दडलेलं आहे. अनेकदा प्रवर्तकांना उद्योग चालविण्यापेक्षा वेगळ्या गोष्टीत रस असतो. आपण चांगले आणि वाईट प्रवर्तकामध्ये भेद करू शकलो तर बाजार आपल्याला बक्षीस नक्कीच देतो. म्हणून व्यवस्थापनाचा दर्जा खूप महत्वाचा आहे.दुसरा धडा आपण बाजारात गोष्टीला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे नाही अनेकदा एखादी गोष्ट ही तात्कालीन असते त्या साठी आपली दीर्घकालीन विचारसरणी सोडणे योग्य नसते. जेव्हा गरज आहे तेव्हाच प्रतिकिया देणे योग्य असते. हा धडा मी बाजाराकडून शिकलो.
तुमचा गुंतवणूकदारांना काय संदेश आहे?
आमचे सीइओ राजीव ठक्कर यांनी काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांना एक पत्र पाठवले आहे. एक निधी व्यवस्थापक या नात्याने आमच्या गुंतवणूकदारांना पुन्हा पुन्हा सांगणे हे आमचे कामच आहे. अस्थिरता हा बाजाराचा धर्म आहे, तुम्ही हे टाळू शकत नाही. समभाग गुंतवणूक ही संपत्ती तयार करण्याची दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या बचतीचे विभाजन करणे आवश्यक आहे. तुम्ही बचतकर्ते असाल आणि तुमच्या बचतीची तुम्हाला तीन वर्षात गरज भासणार असेल तर बँकेच्या मुदत ठेवीत किंवा डेट फंडात पैसे गुंतवणे अधिक सुरक्षित ठरेल. जर तीन ते पाच वर्षासाठी पैसे गुंतविणार असाल तर हायब्रीड फंड योग्य पर्याय आहे, जर तुम्हाला पाच ते सात वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील तरच इक्विटी फंडाचा विचार करावा. बाजार एका दिशेला कधीच जात नाही. दीर्घ कालावधीत बाजार वर गेला तरी दरम्यानच्या काळात काळी वर होत असतो. ही अस्थिरता सहन करण्याची तुमची मानसिकता असेल तरच इक्विटी फंडात गुंतवणूक करा. ॲसेट अलोकेशन समजणं, आणि त्याचे अनुसरण कारण हे मह्त्वाचे आहे.
रौनक ओंकार हे पीपीएफएएस म्युच्युअल फंडाचे समभाग संशोधन प्रमुख आणि फंड व्यवस्थापक आहेत.
संकलन : वसंत कुलकर्णी
