RBI repo rate hike bond market outlook : जागतिक बाजारातील घडामोडी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अन्नधान्याची महागाई या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आगामी पतधोरण आढाव्यात रेपो दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे. तब्बल २३ वर्षांचा समृद्ध अनुभव असलेल्या आणि एक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी देवांग शाह यांच्या मते, आरबीआय रेपो दर ६ ते ६.२५ टक्क्यांपर्यंत नेऊ शकते. अशा परिस्थितीत वाढत्या व्याजदराच्या काळात सामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात आणि रोखे बाजारात नेमकी कोणती रणनीती आखावी, जाणून घ्या.

आमच्या वाचकांना तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीची थोडक्यात ओळख करुन द्या.

मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि मी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये सुवर्णपदक प्राप्त आहे. मी सीएफए (CFA) सुद्धा केले आहे. गेल्या २३ वर्षांचा मला गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. मी ज्या नोकऱ्या केल्या आहेत, त्याबद्दल सांगायचं तर, मी माझ्या करिअरची सुरुवात प्राइस वॉटरहाऊस कूपर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्यांच्या अॅश्युरन्स आणि रिस्क विभागात केली आणि त्यानंतर डॉइश म्युच्युअल फंड, मग आयसीआयसीआय पृडेनशिअल म्युच्युअल फंड आणि नंतर अॅक्सिसमध्ये १४ वर्षांहून अधिक काळ रोखे गुंतवणुकीशी संबंधी काम केले. सध्या मी रोखे गुंतवणुकीचा मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम करत आहे.

एका फंड मॅनेजरच्या दृष्टीकोनातून रोखे बाजार कसा पाहता?

रोखे बाजारा बाबत माझी अपेक्षा अशी आहे की, पुढील आठवड्यात होणाऱ्या पत धोरण आढावा बैठकीत रेपो दर वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. अमेरिकेने व्याज दर आधीच वाढवलेले असल्याने रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढ लांबविणे शक्य नाही. त्यामुळे मला वाटते की रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवेल. अर्थव्यवस्थेबद्दल माझी समज दोन प्रकारची आहे. एक म्हणजे, चार वर्षांनतर आपण पहिल्यांदाच व्याजदर वाढ अनुभावणार आहोत. अर्थ व्यवस्थेत पहिल्यांदाच तीन कारणांनी महागाई अनुभवत आहोत. पहिले कारण अन्नधान्याची महागाई, जागतिक अन्नधान्य महागाई आणि एल निनोच्या प्रभावामुळे स्थानिक अन्नधान्याची महागाई.

दुसरे कारण जिन्नसांच्या वाढत्या किमतीमुळे वाढणारी महागाई, आणि मध्यपूर्वेतील संघर्षामुळे तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वाढणारी महागाई. आपण सध्या एका सुपर सायकलमधून जात आहेत. त्यामुळे विकसित अर्थव्यवस्थांनी आधीच व्याज दर वाढविले आहेत. जेव्हा मी भारताच्या समष्टी अर्थव्यवस्थेकडे पाहतो, तेव्हा विकास दर समाधानकारक राहिला आहे आणि पुढील वर्षासाठी महागाईचा अंदाज ५-५.५ टक्के असेल. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) ५.५ ते ५.२५ च्या दरम्यान राहील. रिझर्व्ह बँक ऑक्टोबरच्या पत धोरण आढावा बैठकीत व्याज दर वाढवण्यास सुरुवात करेल. तसेच दोन किंवा तीन वाढ करून रेपो दर ६-६.२५ टक्के पातळीवर जावा अशी आमची अपेक्षा आहे.

रिझर्व्ह बँक पुढील ६ ते १२ महिन्यांत पाव ते एका टक्का दर वाढवेल. आणि विकास दर स्थिर राहिल्यामुळे, जागतिक मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत असल्यामुळे आणि भारतात महागाईचा दबाव कायम असल्यामुळे व्याज दर वाढवावे लागती. दुसरे म्हणजे, FCNR ठेवी संकलनामुळे रोकड सुलभता खूपच वाढली आहे. आम्हाला विश्वास आहे की रिझर्व्ह बँक उपलब्ध साधनांचा वापर करत आहे. रोकड सुलभता शोषून घेण्यासाठी पारंपारिक साधांनाच्या जोडीला नवीन साधनांचाही वापर करू शकते, जसे की ते रोखे विक्री करून (ओपन मार्केट ऑपरेशन) अतिरिक्त रोकड सुलभता कमी करेल. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ते अर्थ व्यवस्थेतील अतिरिक्त रोकड सुलभता शोषून घेण्यासाठी आणखी १ लाख कोटी ओएमओ करू शकतात.

तुम्ही बाजाराकडून काय शिकलात? केवळ रोखे बाजारच नव्हे तर कोणत्याही भारतीय भांडवली बाजारातून तुम्ही काय शिकलात?
माझ्या मते, रोखे बाजार तुम्हाला रोजच शिकवीत असतो. तुम्हाला मॅक्रो (समष्टी) कशी वागेल याचे स्पष्टीकरण देते आणि संपूर्ण आकलन करून देते. त्यामुळे तुमचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन नेहमीच समष्टीशी निगडित असायला हवा. हा एक शिस्तबद्ध गुंतवणुकीचा दृष्टिकोन आहे, कारण तो तुम्हाला समष्टी स्तरावर सध्याचे आवर्तन काय आहे हे समजण्यास मदत करतो आणि मालमत्तेचे वाटप (ॲसेट ॲलोकेशन) ठरवण्यासाठीही मदत करतो.

दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन असा आहे की, समष्टी आवर्तनामुळे बाजारपेठा खूपच अनिश्चित होत आहेत आणि असा कोणताही निश्चित मालमत्ता वर्ग (ॲसेट क्लास) नाही जो तुम्हाला प्रत्येक वेळी सातत्यपूर्ण परतावा देईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी समष्टीवर अवलंबून राहून आणि मग यशस्वी ठरतील अशा गोष्टी, ठरवून, नेहमीच शिस्तबद्ध मालमत्ता वाटप (ॲसेट ॲलोकेशन) केले पाहिजे. दुसरे म्हणजे, सातत्य नाही, असा कोणताही मालमत्ता वर्ग नाही जो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी देतो आणि म्हणूनच गुंतवणूकदाराने नेहमी शिस्तबद्ध मालमत्ता वाटपावर किंवा मल्टी-ॲसेट फंडांसारख्या थीम्समध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे तुम्हाला समष्टी आवर्तनानुसार विविध मालमत्ता वर्गांमध्ये वाटप करण्यास मदत करेल.

तुम्ही म्युच्युअल फंड युनिट धारकांना काय संदेश द्याल?

गुंतवणुकीचा दीर्घकालीन कालावधी आणि परताव्याची मर्यादा मनात ठेवणे नेहमीच चांगले असते, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा समजेल.तर, ही काही माझी निरीक्षणे आहेत. सर्वप्रथम, गुंतवणूक नेहमी काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असली पाहिजे.त्यामुळे गुंतवणूकदाराला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.एक म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीचा कालावधी.एक म्हणजे मूळ गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफाइल) काय आहे.

जर मी युनिट धारक असेन किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार असेन, तर मला माझी जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफाइल) आणि गुंतवणुकीचा कालावधी (टाइम होरायझन) समजून घेणे आवश्यक आहे.कारण आता सेबीने फंडांच्या विविध श्रेणी तयार करण्यामागचा हाच उद्देश आहे. त्यामुळे, जर तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी माहित असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होईल.

तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, जर एखादा गुंतवणूकदार अस्थिरता सहन करू शकत असेल तर डायनॅमिक बॉण्ड फंडांचा विचार करावा कारण या फंड प्रकारत अस्थिरता खूप असते. जर एखादा गुंतवणूकदार पुराणमतवादी (कोंझरव्हेटीव्ह) असेल, तर कॉर्पोरेट डेट फंड अधिक सोयीचा असेल


देवांग शाह, मुख्य गुंतवणूक अधिकारी (स्थिर उत्पन) एक्सिस म्युच्युअल फंड.
संकलन – वसंत कुलकर्णी
संकल्पना – गौरव मुठे