What Are Life Cycle Funds In Mutual Funds India: भारतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नियमांत अलिकडील काळात अनेक बदल झाले असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे लाईफ सायकल फंड्सची सुरुवात. म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण यावरील नव्या परिपत्रकानुसार, सेबीने फंड हाऊसेसना निवृत्तीसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ही नवीन श्रेणी उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे.
या निर्णयामुळे गुंतवणूक प्रक्रिया अधिक सोपी होण्याची अपेक्षा आहे, विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल करणे आवडत नाही.
लाईफ सायकल फंड्सचे वैशिष्ट्य
सेबीच्या सुधारित आराखड्याचा भर हा फंड मॅनेजर्सना अधिक लवचिकता देण्यावर आणि त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी योजना अधिक स्पष्ट करण्यावर आहे. लाईफ सायकल फंड्सचे वैशिष्ट्य म्हणजे, गुंतवणूकदार त्याच्या आर्थिक ध्येयापासून किती दूर आहे, यावर आधारित हे फंड्स काळाप्रमाणे गुंतवणुकीच्या पद्धतीत आपोआप बदल करतात.
या दृष्टिकोनामुळे अनेक पारंपारिक निवृत्ती योजनांमधील मुख्य त्रुटी दूर होणार आहेत, जिथे मालमत्ता वाटप (अॅसेट अलोकेशन) स्थिर राहते आणि निवृत्ती जवळ येत असताना बदलणाऱ्या जोखमीचा त्यावर परिणाम होत नाही.
तज्ज्ञांचे मत काय?
एडलवाईस म्युच्युअल फंडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राधिका गुप्ता म्हणाल्या की, हा बदल भारतातील गुंतवणूक व्यवस्थेतील सकारात्मक बदलांचा एक भाग आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राधिका गुप्ता यांनी लिहिले, “गेल्या काही वर्षांत, सेबीने मालमत्ता व्यवस्थापक (फंड मॅनेजर्स) काय करू शकतात याचा अर्थपूर्ण विस्तार केला आहे. डेट पॅसिव्ह रेग्युलेशन्स, स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स आणि आता लाईफ सायकल फंड्स ही याची उत्तम उदाहरणे आहेत. हे केवळ वरवरचे बदल नाहीत. उलट यामुळे गुंतवणुकीचे पर्याय वाढतात. या व्यवसायात नवनवीन गोष्टी घडवण्यासाठी हा खरोखरच सर्वोत्तम काळ आहे.”
लाईफ सायकल फंड्स म्हणजे काय? त्याचे काम कसे चालते?
लाईफ सायकल फंड्सची रचना अशा प्रकारे केली आहे की, गुंतवणूकदार जसा त्याच्या ठराविक ध्येयाच्या (सहसा निवृत्तीच्या) जवळ पोहोचतो, तसे या फंडातील मालमत्ता वाटप (अॅसेट अलोकेशन) आपोआप बदलत जाते. सुरुवातीच्या वर्षांमध्ये हे फंड इक्विटीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात, ज्यामध्ये अधिक वाढीची क्षमता असते, परंतु त्यासोबतच जोखीमही जास्त असते.
बाजारातील अस्थिरतेचा परिणाम नाही
जसजसे ध्येय जवळ येते, तसतसा हा फंड हळूहळू अधिक सुरक्षित पर्यायांमध्ये, जसे की बाँड्स आणि इतर निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये अधिक पैसे वळवतो. यामुळे बाजारातील अस्थिरतेचा जमा झालेल्या बचतीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.
कारण यामध्ये गुंतवणुकीचे वाटप (अॅसेट अलोकेशन) आपोआप बदलते, त्यामुळे गुंतवणूकदारांना स्वतःच्या पोर्टफोलिओचे वारंवार पुनर्संतुलन करण्याची गरज भासत नाही. यामुळे शिस्त राखण्यास मदत होते आणि बाजारातील चढ-उतारांच्या वेळी भावनिक निर्णय घेणे टाळता येते.
