Mutual Funds Returns Warning: प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि GQuant चे संस्थापक शंकर शर्मा यांच्या मते सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हे जोखीम-मुक्त चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी एक उत्तम आर्थिक साधन आहे. मात्र, एसआयपी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तितकेसे फायदेशीर ठरलेले नाही.

एनडीटीव्ही प्रॉफिटच्या एका कार्यक्रमात शंकर शर्मा यांनी असे नमूद केले की, एसआयपी मधून केवळ संस्थात्मक गुंतवणूकदारांनीच नफा कमावला आहे, तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी मात्र ते एखाद्या ‘सक्तीच्या ईएमआय’ सारखे ठरले आहे.

“एसआयपी मुळे मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण झाला आहे, पण याचा फायदा एसआयपी करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना झाला नाही. सामान्य गुंतवणूकदाराने यातून जेवढा पैसा कमावला नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटलिस्ट, फॅमिली ऑफिसेस आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी यांनी कमावला आहे. त्यामुळे, हे एक उत्तम उत्पादन नक्कीच आहे, पण केवळ या चार प्रमुख गटांसाठीच”, असे शंकर शर्मा यांनी सांगितले.

शंकर शर्मा यांच्या मते, भारतीय शेअर बाजाराचे मूल्यांकन अजूनही खूप महाग आहे आणि यामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग मिळाला आहे. विदेशी गुंतवणूकदार मेगा आयपीओमधून बाहेर पडत असल्यामुळे बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या परताव्यावर देखील याचा परिणाम झाला आहे.

शर्मा यांच्या मते, भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांना मिळणारा निव्वळ परतावा कमी आहे. “गुंतवणुकीचा मोठा ओघ ‘एसआयपी’ या प्रणालीद्वारे आला आहे”, असा दावा त्यांनी केला.

गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय कोणते?

स्थिर परताव्यासाठी सामान्य गुंतवणूकदार विचार करू शकतील अशा इतर गुंतवणूक पर्यायांचा उल्लेख करताना शर्मा म्हणाले की, भारतीयांसाठी आजही सोने हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. “इतर पर्यायांचा विचार करता, सामान्य भारतीयाच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये रिअल इस्टेट, मुदत ठेवी आणि कॉर्पोरेट ठेवींचा वाटा साधारणपणे ८० ते ९० टक्के असावा. तर १० टक्के वाटा म्युच्युअल फंडांचा असू शकतो”, असे ते म्हणाले.

शर्मा पुढे म्हणाले की, त्यांना पुढील चार वर्षांत निफ्टी ५० निर्देशांकातून जास्त मोठा परतावा मिळेल असे वाटत नाही. त्यांच्या मते, इक्विटी मार्केट व्यावसायिकांसाठी आहे आणि सरासरी गुंतवणूकदारांनी त्यामध्ये थेट गुंतवणूक करताना सावध असले पाहिजे.