SIP Investment Power of Compounding : रमेश आणि सुरेश लहानपणापासूनचे चांगले मित्र. अगदी बालवाडीपासून पदवीपर्यंत सोबतच शिक्षण घेतलं आणि नोकरीही एकाच कंपनीत सुरू केली. रमेशने वयाच्या तिसाव्या वर्षी १० हजार रुपयांची एसआयपी सुरू केली. मात्र, सुरेशला १० वर्ष उशीरा जाग आली आणि त्याने चाळीसाव्या वर्षी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. गॅप भरुन काढण्यासाठी सुरेशने १५ हजार रुपयांची एसआयपी सुरू केली. वयाच्या ६० वर्षांपर्यंत दोघांची गुंतवणूक सारखीच होते. मात्र, दोघांना मिळालेल्या परताव्यात मात्र तब्बल १.५० कोटी रुपयांचा फरक पाहायला मिळतो. तुम्ही जर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर हे गणित समजून घेणे फार आवश्यक आहे.

२० वर्षांसाठी १५ हजार की ३० वर्षांसाठी १० हजार…

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जास्त पैसे गुंतवले म्हणजे मोठा परतावा मिळेल, असा अनेकांचा समज आहे. रक्कम नक्कीच महत्त्वाची आहे, मात्र त्यापेक्षा तुम्ही बाजारात किती काळ पैसे गुंतवता हे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे. २० वर्षांसाठी दरमहा १५ हजार रुपये गुंतवणे अधिक योग्य की ३० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये? या प्रश्नाचे आर्थिक गणित मांडल्यास, कालावधी हा रक्कमेपेक्षा कितीतरी पटीने प्रभावी ठरतो, हे स्पष्ट होते.

गुंतवणुकीचे निकष३० वर्षे (दीर्घ कालावधी)२० वर्षे (कमी कालावधी)
दरमहा एसआयपी१०,०००१५,०००
गुंतवणुकीचा कालावधी३० वर्षे२० वर्षे
एकूण गुंतवलेली मुद्दल३६,००,००० लाख३६,००,००० लाख
अपेक्षित निव्वळ परतावा (१२% दराने)३,१६,९९,१३७ कोटी१,१३,८७,२०३ कोटी
निवृत्तीसमयी मिळणारा एकूण निधी३,५३,९९,१३७ (३.५४ कोटी)१,४९,८७,२०३ (१.५० कोटी)

पावर ऑफ कंपाउंडिंग

या विश्लेषणातून भांडवली बाजारातील चक्रवाढ व्याजाची ताकद पाहायला मिळते. सुरशने रमेशपेक्षा दरमहा ५,००० रुपये जास्त गुंतवूनही केवळ कालावधी १० वर्षांनी कमी असल्यामुळे अंतिम परतावा १.५० कोटींवरच मर्यादित राहतो. याउलट, दरमहा कमी रक्कम गुंतवून १० वर्षे जास्त वेळ दिल्यास थेट दुप्पट निधी जमा होतो. म्हणजे बाजारात दीर्घकाळ टीकून राहणे किती महत्त्वाचे आहे, हे यातून स्पष्ट होते.

‘स्टेप-अप एसआयपी’ ठरू शकते ‘गेम चेंजर’

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३० वर्षांसाठी १०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि दरवर्षी आपल्या वाढत्या उत्पन्नासोबत त्यात केवळ १०% वाढ केली, तर हे चित्र पूर्णपणे बदलू शकते. समजा तुम्ही ३० वर्ष १०,००० रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला ३.५४ कोटी रुपये मिळाले. यातच दरवर्षी स्टेप-अप एसआयपी (म्हणजे दरवर्षी गुंतवणुकीत वाढ करणे) केली तर अंतिम रक्कम तब्बल ११.४० कोटींपेक्षा जास्त होऊ शकतो.