Record SIP Inflow December 2025: म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता कायम असून सरलेल्या डिसेंबर महिन्यात विक्रमी ३१,००० कोटी रुपयांचा ओघ आला आहे. जागतिक अनिश्चितता आणि भांडवली बाजारातील अस्थिरतेच्या काळात देखील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास अबाधित असल्याचे निदर्शनास येत आहे.

एकीकडे ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ६ टक्क्यांनी घसरून २८,०५४ कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. समभाग संलग्न योजना अर्थात ‘इक्विटी’मधील गुंतवणुकीतील ही घट म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मालमत्ता आधारातील किरकोळ संकोचासोबतच दिसून आली. उद्योग संघटना ‘अॅम्फी’ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कर्जरोखे योजनांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्याच्या परिणामामुळे म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) नोव्हेंबरमधील ८०.८० लाख कोटी रुपयांवरून डिसेंबरमध्ये ८०.२३ लाख कोटी रुपयांवर घसरली आहे.

उद्योगाच्या ‘एयूएम’मधील ही घट प्रामुख्याने तरलता (लिक्विडिटी) व्यवस्थापनासाठी रोखे संलग्न फंडातून झालेल्या निधीच्या निर्गमनामुळे आणि बाजाराशी संबंधित मूल्यांमधील मर्यादित बदलांमुळे झाली, असे ‘अॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट एन. चलासानी म्हणाले.

एकूणच, म्युच्युअल फंड उद्योगाने डिसेंबर महिन्यात ६६,५९१ कोटी रुपयांचा निव्वळ निर्गमन नोंदवले, जे प्रामुख्याने कर्जरोखे योजनांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्यामुळे झाले, तरीही ‘इक्विटी’ आणि ‘गोल्ड फंडां’नी गुंतवणूकदारांचे आकर्षण कायम ठेवले आहे.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीनुसार, इक्विटीमधील गुंतवणूक नोव्हेंबरमधील २९,९११ कोटी रुपयांवरून अनुक्रमे कमी झाली असली, तरी ती ऑक्टोबरमधील २४,६९० कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे. बाजारातील अधूनमधून होणाऱ्या अस्थिरतेनंतरही ‘इक्विटी’मधील गुंतवणूक लवचिक राहिली, ज्याला ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) स्थिर योगदानाचा आणि देशाच्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टिकोनावरील सततच्या आत्मविश्वासाचा सुपरिणाम दिसून आला. ‘एसआयपी’द्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग नोव्हेंबरमधील २९,४४५ कोटी रुपयांवरून डिसेंबरमध्ये ३१,००० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला, जे शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या धोरणांसाठी त्यांची पसंती दर्शवते.

फ्लेक्सी-कॅप फंड योजनेत सर्वाधिक १०,०१९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, जी नोव्हेंबरमधील ८,१३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, हे अनिश्चित बाजाराच्या परिस्थितीत त्यांची वाढती लोकप्रियता दर्शवते. त्यानंतर मिड-कॅप फंडात ४,१७६ कोटी, लार्ज अँड मिड-कॅप फंड ४,०९४ कोटी आणि स्मॉल-कॅप फंडामध्ये ३,८२४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, लार्ज-कॅप फंडांनी १,५६७ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.

याउलट, ईएलएसएस आणि डिव्हिडंड यील्ड फंडांनी अनुक्रमे ७१८ कोटी रुपये आणि २५४ कोटी रुपयांचा निव्वळ निर्गमन नोंदवले. तसेच, डेट म्युच्युअल फंडांमधून डिसेंबरमध्ये १.३२ लाख कोटी रुपयांचा मोठा निधी बाहेर काढण्यात आला.

गोल्ड ईटीएफचे वाढते आकर्षण

गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समध्ये डिसेंबरमध्ये निव्वळ आवक वाढून ११,६४७ कोटी रुपये झाली, जी नोव्हेंबरमधील ३,७४२ कोटी रुपये आणि ऑक्टोबरमधील ७,७४३ कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. २०२५ या कॅलेंडर वर्षात सोन्याने ७० टक्क्यांहून अधिक परतावा दिल्यानंतर गोल्ड ईटीएफमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक आवक नोंदवली.

‘एसआयपी’तून ३.३४ लाख कोटींची भर

सरलेले कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युहक्युअल फंडात एकूण ३.३४ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. ‘एसआयपी’चे योगदान हे अल्प-मुदत गुंतवणूक दृष्टिकोनाऐवजी दीर्घकालीन गुंतवणूक हेतू आणि आत्मविश्वास दर्शवतो.