नवी दिल्ली : देशांतर्गत भांडवली बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात एसआयपी खाती बंद करण्याचे प्रमाण वाढूनही आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एसआयपीमधील निव्वळ गुंतवणुकीचा ओघ विक्रमी दोन लाख कोटींवर पोहोचला. किरकोळ गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वाढता कल यामागे असल्याचे म्युच्युअल फंड क्षेत्रातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ एसआयपी ओघ हा एकूण ३.५ लाख कोटी रुपयांच्या सकल एसआयपी गुंतवणुकीच्या ५६ टक्के इतका होता; हे प्रमाण गेल्या किमान तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे प्रमाण ५४ टक्के होते. एकूण एसआयपी गुंतवणुकीतून ‘रिडेम्पशन्स’ (गुंतवणूक काढून घेणे) वजा करून निव्वळ एसआयपी ओघ मोजला जातो. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’द्वारे जाहीर केली जाणारी मासिक एसआयपी ओघाची आकडेवारी ही सकल आकडेवारी असते.

गेल्या वर्षी खाती बंद होण्याचे प्रमाण वाढले असले तरी, त्यामुळे गुंतवणूक काढून घेण्याच्या (रिडेम्पशन्स) प्रमाणात मोठी वाढ झाली नाही. सकल आणि निव्वळ एसआयपी आकडेवारीवरून काढलेल्या निष्कर्षानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एसआयपी खात्यांमधून बाहेर पडलेली रक्कम १.५ लाख कोटी रुपये इतकी होती. आर्थिक वर्ष २०२५ मधील १.३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम १५ टक्क्यांनी अधिक असली, तरी ही वाढ गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी होती. याआधी, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये हा ओघ ५७ टक्क्यांनी आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १८ टक्क्यांनी वाढला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, आर्थिक वर्ष २०२६ मधील रिडेम्पशन्सची वाढ ही आर्थिक वर्ष २०२५ मधील सकल ओघातील २१ टक्के वाढीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होती.

म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत वाढलेली मानसिकता हे निव्वळ एसआयपी ओघातील वाढीचे मुख्य कारण आहे. ‘भारतातील कौटुंबिक बचतीचा एसआयपी हा खरोखरच एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. ज्याची सुरुवात बहुतांश लोकांसाठी इक्विटी गुंतवणुकीत प्रवेश करण्याचे एक साधन म्हणून झाली होती, त्याचे आता शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक धोरणात रूपांतर झाले आहे. हा बदल आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. सकल एसआयपी ओघात वाढ होत असतानाही, निव्वळ ओघ तितकाच मजबूत राहिला आहे,’ असे ‘मिरे ॲसेट म्युच्युअल फंड’च्या वितरण आणि धोरणात्मक भागीदारी विभागाच्या प्रमुख सुरंजना बोरठाकूर यांनी सांगितले.

नवीन एसआयपी खात्यांची वाढ मंदावली

निव्वळ एसआयपी गुंतवणुकीने विक्रम नोंदविला असला, तरी नवीन एसआयपी खात्यांच्या वाढीवर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम झाला. सरलेल्या आर्थिक वर्षात एसआयपी खात्यांमध्ये केवळ ४० लाखांची भर पडली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२४-२५ मध्ये जवळपास १.७ कोटी खात्यांची निव्वळ वाढ झाली होती. सप्टेंबर २०२४ पासून इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले.