SIP Investment Tips : जागतिक घडामोडी आणि कमकुवत संकेत यामुळे आज बुधवार, ३ जून २०२६ रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये गुंतवणूकदारांचे २.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. जेव्हा बाजार कोसळतो, तेव्हा अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदार घाबरून आपली एसआयपी थांबवण्याचा किंवा बंद करण्याचा चुकीचा निर्णय घेतात. मात्र, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, बाजारातील ही घसरण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्वस्तात खरेदी करण्याची सर्वात मोठी संधी असते.

मार्केट क्रॅशचा एसआयपीला कसा होतो फायदा?

बाजारात घसरण झाल्यामुळे तुमच्या जुन्या गुंतवणुकीचे मूल्य जरी कमी झाले, तरी तुमच्या बँकेतून दरमहा कापल्या जाणाऱ्या नवीन हप्त्याद्वारे तुम्हाला कमी किमतीत म्युच्युअल फंडच्या जास्त युनिट्स मिळतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, बाजारातील घसरण तुम्हाला पूर्वीच्याच पैशात फंडामध्ये जास्त हिस्सेदारी मिळवून देते. नंतर जेव्हा बाजार पुन्हा सावरतो, तेव्हा याच अतिरिक्त युनिट्समुळे तुमच्या नफ्यात प्रचंड वाढ होते. उदा. जर तुम्हाला ५००० रुपयांच्या गुंतवणुकीत पूर्वी २०० युनिट्स मिळाले होते, घसरणीत त्याच किमतीत ३०० युनिट मिळू शकतात.

‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ म्हणजे काय?

बाजारात कसेही चढउतार असले तरी, तुम्ही ठराविक अंतराने एक निश्चित रक्कम गुंतवत राहता, हा एसआयपीचा सर्वात मोठा फायदा आहे. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा म्युच्युअल फंडची एनएव्ही (Net Asset Value) देखील कमी होते. यामुळे त्याच रकमेत जास्त युनिट्स खरेदी होऊन तुमची सरासरी गुंतवणूक किंमत कमी होत जाते. या प्रक्रियेला ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ म्हणतात. जेव्हा बाजारात रिकव्हरी येते, तेव्हा या कमी किमतीत खरेदी केलेल्या युनिट्समुळे एकूण परतावा अत्यंत मजबूत होतो.

एसआयपी गुंतवणूकदारांसाठी ‘XIRR’ का महत्त्वाचा?

बहुतांश गुंतवणूकदार परतावा मोजण्यासाठी ‘CAGR’ (Compound Annual Growth Rate) पाहतात. परंतु, CAGR हा प्रामुख्याने एकरकमी गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरतो. एसआयपीमध्ये दरमहा वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या एनएव्हीवर गुंतवणूक होत असते. अशा वेळी XIRR (Extended Internal Rate of Return) हा गुंतवणुकीचा वास्तविक वार्षिक परतावा दर्शवतो. त्यामुळे एसआयपी पोर्टफोलिओची कामगिरी समजून घेण्यासाठी नेहमी XIRR कडेच पाहिले पाहिजे.

गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चूक

बाजार घसरताच एसआयपी थांबवणे किंवा भीतीपोटी पैसे काढून घेणे ही गुंतवणूकदारांची सर्वात मोठी चूक ठरते. जर तुमचे आर्थिक उद्दिष्ट १५ ते २० वर्षांचे असेल तर घसरणीचा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ आहे. उलट, अशा काळात जर तुमच्याकडे अतिरिक्त उत्पन्न असेल, तर नियमित एसआयपी सुरू ठेवण्यासोबतच ‘टॉप-अप एसआयपी’ करून गुंतवणुकीची रक्कम वाढवली पाहिजे. हीच रणनीती दीर्घकाळात तुम्हाला मजबूत संपत्ती निर्माण करून देईल.

उदाहरणावरुन समजून घ्या

समजा रमेश आणि सुरेश हे दोन मित्रांनी एकाचवेळी म्युच्युअल फंडात १०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली. मात्र, बाजाराताली घसरण पाहून रमेशने त्याची एसआयपी थांबवली आणि बाजार सावरल्यानंतर पुन्हा सुरू केली. तर सुरेशने कोणताही विचार न करता एसआयपी सुरुच ठेवली. तज्ज्ञांच्या मते बाजाराच्या घसरणीत सुरेशला १०,००० रुपयांमध्ये जास्त युनिट्स मिळाले. तर रमेशची ही संधी हुकली. जेव्हा बाजारात सुधारणा झाली, तेव्हा सुरेशचा पोर्टफोलिओ २.५१ लाख रुपयांपर्यंत पोहोचला. त्याचा XIRR परतावा ४९ टक्के होता. तर दुसरीकडे रमेशचा पोर्टफोलिओत केवळ १.४६ लाख जमा झाले. त्याचा XIRR परतावाही २७% पर्यंत मर्यादीत राहिला.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.