scorecardresearch

माझा पोर्टफोलिओ : अग्रगण्य पेटकोक ‘कॅल्साइनर’ – गोवा कार्बन लिमिटेड

वर्ष १९६७ मध्ये स्थापन झालेल्या डेम्पो ग्रुप ऑफ कंपनीजची ‘गोवा कार्बन लिमिटेड’ ही कंपनी कॅल्साइन्ड पेट्रोलियम कोक उत्पादन आणि विपणन व्यवसायात कार्यरत आहे.

my portfolio
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अजय वाळिंबे

वर्ष १९६७ मध्ये स्थापन झालेल्या डेम्पो ग्रुप ऑफ कंपनीजची ‘गोवा कार्बन लिमिटेड’ ही कंपनी कॅल्साइन्ड पेट्रोलियम कोक उत्पादन आणि विपणन व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीचे संपूर्ण उत्पन्न केवळ या एकाच उत्पादनातून आहे. कॅलक्सिन केलेले पेट्रोलियम कोक हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम स्मेल्टिंग, ग्रेफाइट इलेक्ट्रोड आणि टायटॅनियम डायऑक्साइड निर्मितीमध्ये वापरले जाते. साहजिकच कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत देशांतर्गत बाजारपेठेतील कंपन्या जसे, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लि., हिंदाल्को इंडस्ट्रीज, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि., वेदान्त इत्यादींचा समावेश होतो. याखेरीज कंपनी ॲल्युमिनियम पेचिनी – फ्रान्स, ॲल्युमिनियम ऑफ ग्रीस (एओजी), सॅबिक – सौदी अरेबिया, दुबई ॲल्युमिनियम (दुबॅल), सोहर ॲल्युमिनियम कंपनी – ओमान यांसारख्या काही परदेशी आंतरराष्ट्रीय ग्राहकांना देखील ती पुरवठा करते. कंपनीचे गोवा, छत्तीसगडमधील बिलासपूर आणि ओरिसामधील पारादीप येथे उत्पादन प्रकल्प असून एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ३०८,००० मेट्रिक टन आहे.

परकीय चलन धोका

कंपनीच्या व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये रॉ पेट्रोलियम कोकसारख्या कच्च्या मालाची आयात समाविष्ट आहे, जी डॉलरच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय किमतीशी जोडलेली आहे. परिणामी कंपनीला तिच्या आयातीवरील विनिमय दरातील चढ-उतारांचा सामना करावा लागतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आयात निर्बंध असून कॅल्सिनर्सद्वारे जीपीसीची आयात आणि ॲल्युमिनियम स्मेल्टर्सद्वारे सीपीसीची आयात अनुक्रमे वार्षिक १.४० दशलक्ष टन आणि ०.५० दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित केली गेली आहे. त्यामुळे उर्वरित उत्पादन गोवा कार्बनसारख्या भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी करावे लागते.

कंपनीचे डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ९३ टक्के वाढ नोंदवून ती ४१७ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात ५७ टक्के वाढ होऊन तो २५.५९ कोटीवर गेला आहे. कंपनीवर कर्जभार जास्त असला तरीही केवळ ५.५० किंमत/ उत्पन्न (पी / ई) गुणोत्तर असलेली ही कंपनी वाढत्या मागणीमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात तसेच येत्या वर्षात उत्तम कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून गोवा कार्बनचा जरूर विचार करा. सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

गोवा कार्बन लिमिटेड (बीएसई कोड ५०९५६७)

प्रवर्तक: डेम्पो समूह

बाजारभाव: रु. ५४३/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: कालसिंद पेट्रोलियम कोक

भरणा झालेले भागभांडवल: रु. ९.१५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५९.७२

परदेशी गुंतवणूकदार ०.०२

बँक/ म्युच्युअल फंडस्/ सरकार ०.०१

इतर/ जनता ४०.२५

पुस्तकी मूल्य: रु. १७० /- `

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ९९.०९

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५.४४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २६.४

डेट इक्विटी गुणोत्तर: २.१९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ४.१९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २४.८

बीटा : १.५

बाजार भांडवल: रु. ४९८ कोटी (मायक्रो स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६८३ / ३२०

Stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व अर्थभान ( Business ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 10:26 IST
ताज्या बातम्या