अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदाणींनंतर पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे हिंडेनबर्गने आपल्या अहवालात ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकवर गंभीर आरोप केलेत. यामध्ये हिंडेनबर्ग आपल्या अहवालात वारंवार एका भारतीय महिलेचे नाव घेत आहेत. अखेर वारंवार या महिलेचे नाव का घेतले जात आहे? ३ लाख कोटींचे नेमके कनेक्शन काय आहे हे जाणून घेऊयात.
हिंडेनबर्गने जॅक डोर्सीच्या पेमेंट फर्म ब्लॉक इंक(Block Inc)च्या व्यवस्थापनाशी संबंधित अनेक लोकांवर अनेक गंभीर आरोप केलेत. यामध्ये एक नाव आहे अमृता आहुजा. अमृता आहुजांवर कंपनीच्या शेअर्समध्ये फेरफार करून ते बुडवल्याचा गंभीर आरोप आहे.
कोण आहेत अमृता आहुजा?
अमृता आहुजा या भारतीय-अमेरिकन वंशाची महिला आहेत. त्या सध्या ब्लॉक इंकमध्ये मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच CFO म्हणून तैनात आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ड्यूक युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल यांसारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्या २०१९ मध्ये ब्लॉक इंक कंपनीत रुजू झाल्या आणि २०२१ मध्ये जॉक डोर्सीच्या कंपनीने त्यांना सीएफओ बनवले गेले.
ब्लॉक इंकमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी Airbnb, McKinsey & Company, The Walt Disney Company सारख्या कंपन्यांमध्ये काम केले. ‘कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश, वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट’ यांसारखे गेमही त्यांनी बनवलेत. अमृता आहुजा यांनी २००१ मध्ये मॉर्गन स्टॅनलीसोबत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अमृता आहुजा या मूळच्या भारतीय असून, त्यांचे पालक क्लीव्हलँडमधील डे-केअर सेंटरचे मालक होते.
३ लाख कोटींचे कनेक्शन काय?
हिंडेनबर्गने त्यांच्या नवीन खुलाशामध्ये ब्लॉक इंकचे संस्थापक जॅक डोर्सी आणि जेम्स मॅकेल्वे यांच्यासह अमृता आहुजा आणि त्यांची 3 लाख कोटींची पेमेंट कंपनी ‘ब्लॉक इंक’चे लीड मॅनेजर ब्रायन ग्रास्डोनिया यांच्यावर शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची अफरातफार केल्याचा आरोप लावला आहे. जॅक डोर्सी आणि वरिष्ठ अधिकार्यांनी इतरांची पर्वा न करता प्रथम त्यांची सुरक्षा सुनिश्चित केल्याचाही त्यात ठपका ठेवण्यात आला आहे.
अदाणींना हिंडेनबर्गच्या अहवालानं मोठं नुकसान
यापूर्वी २४ जानेवारीला हिंडेनबर्गने अदाणी समूहावर अहवालातून गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अदाणी समूहाला मोठा झटका बसल्याने त्यांची एकूण संपत्ती १४७ अब्ज डॉलरवर घसरली. गौतम अदाणी यांची संपत्ती १२७ अब्ज डॉलरवरून ४० अब्ज डॉलरच्या खाली घसरली. तसेच त्यांचे शेअर्स ८५% घसरले होते. हिंडेनबर्गच्या या धक्क्यातून अदाणी आजतागायत सावरू शकलेले नाहीत.