Nandan Nilekani Birthday Special Story : भारतात आधारकार्डशिवाय तुमचं पानही हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. शाळेच्या प्रवेशापासून बँक खाते, सिम कार्ड ते पासपोर्ट काढण्यापर्यंत प्रत्येक सरकारी किंवा खासगी ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. आज सरकार कोणत्याही मध्यस्थाशिवाय कोट्यवधी शेतकऱ्यांना (उदा. पीएम किसान निधी), गॅसची सबसिडी किंवा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. हे आधारकार्डशिवाय कधीच शक्य झालं नसतं. पण, या डिजिटल ओळखपत्रामागे कोणाचं डोकं आहे माहिती आहे का? या अवलियाचं नाव आहे, नंदन नीलेकणी. त्यांना आधारकार्डचे जनक म्हटलं जातं. आज त्यांचा जन्मदिवस आहे. मात्र, एवढीच त्यांची ओळख नाही. नेतृत्वापासून दातृत्वापर्यंत त्यांनी अफाट काम करुन ठेवलंय. जन्मदिवसानिमित्ताने त्यांच्या कामाचा धांडोळा घेऊ.

‘इन्फोसिस’चा पहिला शिलेदार

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस म्हटलं की कोणाच्याही डोळ्यासमोर पहिलं नाव नारायण मूर्ती येतं. पण, अनेकजणांना या कंपनीच्या पहिल्या शिलेदाराचं नाव माहिती नाही. तर नंदन नीलेकणी यांनी देशातील नामांकित संस्था ‘आयआयटी बॉम्बे’मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर १९७८ मध्ये त्यांनी ‘पटनी कॉम्प्युटर सिस्टम्स’मध्ये पहिल्या नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्यांची मुलाखत दुसऱ्यातिसऱ्या कोणी नाही तर एन. आर. नारायण मूर्ती यांनी घेतली होती. या भेटीनंतर अवघ्या ३ वर्षांनी, म्हणजेच १९८१ मध्ये नंदन नीलेकणी यांनी नारायण मूर्ती आणि इतर सहकाऱ्यांसह मिळून ‘इन्फोसिस’चा पाया रचला. पुढे ही कंपनी जगातील अग्रगण्य आयटी कंपनी बनली. नीलेकणी यांनी २००२ ते २००७ या काळात इन्फोसिसचे सीईओ म्हणूनही धुरा सांभाळली. या काळात कंपनीने जगभरात हातपाय पसरले.

प्रत्येक भारतीयाला डिजिटल ओळख

नंदन नीलेकणी यांना ‘आधार कार्ड’चे जनक मानले जाते. केंद्र सरकारच्या विशेष निमंत्रणावर त्यांनी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ (UIDAI) चे पहिले अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याच दूरदृष्टीतून देशातील १३० कोटींपेक्षा जास्त नागरिकांना ‘आधार कार्ड’च्या रूपाने एक सुरक्षित आणि अनोखी डिजिटल ओळख मिळाली. आधार कार्ड नसले असते तर आजचा भारत डिजिटल दृष्ट्या इतका गतिमान झाला नसता. आपण आजही जुन्या, संथ आणि कागदी कारभाराच्या दुष्टचक्रात अडकून राहिलो असतो. आधारने सर्वसामान्य नागरिकाला त्याची हक्काची ‘डिजिटल ओळख’ मिळवून दिली आहे. आणि यात सिंहाचा वाटा नंदन नीलेकणी यांचा आहे.

श्रीमंतीत नाही पण दातृत्वात सर्वात पुढे

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की अंबानी, अदानी किंवा टाटा अशीच नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण, देशात असाही एक उद्योगपती आहे, जो श्रीमंतांच्या यादीत १०० व्या स्थानी असला तरी दातृत्वाच्या बाबतीत टॉपमध्ये आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार ते भारतातील १०० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून दान देण्याच्या बाबतीत ते देशात थेट सहाव्या क्रमांकावर येतात.

जिथं शिकले त्या कॉलेजला दिले ३१५ कोटी!

नंदन नीलेकणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांनी जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ‘गिव्हिंग प्लेज’ वर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ ते आपल्या एकूण संपत्तीचा निम्मा हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान करणार आहेत. वर्ष २०२३ मध्ये नीलेकणी यांनी ज्या संस्थेत शिक्षण घेतलं, त्या आयआयटी बॉम्बेला जागतिक दर्जाचे संशोधन आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तब्बल ३१५ कोटी रुपये दिले होते.

साधी राहणी उच्च विचारसरणी

‘फोर्ब्स’च्या रिअल-टाइम डेटा रिपोर्टनुसार, नंदन नीलेकणी यांची एकूण संपत्ती २५,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या संपत्तीसह ते भारतातील १०० वे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. एवढी अफाट संपत्ती आणि जागतिक प्रभाव असूनही, नंदन नीलेकणी हे त्यांच्या राहणीमानासाठी ओळखले जातात. नवीन स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. आज ते देशातील कोट्यवधी तरुणांसाठी आणि नवउद्योजकांसाठी एक आदर्श रोल मॉडेल आहेत. खऱ्या अर्थाने नंदन नीलेकणी यांची साधी राहणी पण उच्च विचारसरणी आहे.