देशातील कृषी जिनसांचे सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ असलेल्या ‘नॅशनल कमॉडिटी ॲण्ड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज’ने (एनसीडीईएक्स) पर्जन्यमानावर आधारित देशातील पहिल्या ‘रेनमुंबई’ वायदे (डेरिव्हेटिव्ह) करारांना सुरूवात करत असल्याची घोषणा बुधवारी केली आहे. हे करार येत्या १ जूनपासून सुरू होणार असून, हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
पावसाबाबत अनिश्चितता आता केवळ आव्हान न राहता, नियमनबद्ध आणि वैज्ञानिक चौकटीत मोजता येणारी, व्यवस्थापित करता येणारी आणि व्यापारयोग्य जोखीम म्हणून रूपांतरित होणार आहे. हा उत्पादन प्रकार आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला असून, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांच्या अधिकृत आकडेवारीवर तो बेतलेला आहे. यामुळे हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक जोखमीपासून सहभागी घटकांना संरक्षण (हेजिंग) मिळू शकेल.
‘रेनमुंबई’ (RAINMUMBAI) वायदे करार हे शेतकरी, बांधकाम कंपन्या, वीज वितरण संस्था, कृषी कर्ज देणाऱ्या बँका आणि गोदाम सेवा व वाहतूकदार (लॉजिस्टिक्स ऑपरेटर्स) यांसारख्या विविध घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एका नव्या मालमत्ता वर्गाचा उदय होत असून, भारतातील हवामान जोखीम व्यवस्थापन प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
शतकानुशतके मान्सूनच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागला आहे. आता ‘रेनमुंबई’ वायदे कराराच्या माध्यमातून या अनिश्चिततेचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे, असे एनसीडीईएक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण रास्ते म्हणाले.
व्यवहार कसे पार पडणार?
हे फ्युचर्स करार असून ‘रेनमुंबई’ या टिकर चिन्हाखाली हे व्यवहार पार पडतील. भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांकडून प्राप्त होणाऱ्या दैनंदिन पर्जन्यमानाची माहिती वापरून तयार करण्यात आलेली आणि ३० वर्षांच्या भक्कम ऐतिहासिक विदावर आधारित हे करार आकाराला येतील. या वायद्यांच्या एका लॉटचे मूल्य सुमारे १.१० लाख रुपयांच्या घरात आहे.
यासाठी गुंतवणूकदाराला किमान लॉट साईजच्या १० टक्क्यांपर्यंत म्हणजेच दहा ते बारा हजार मार्जिन राखावे लागेल. शिवाय पर्जन्यमानावर आधारित हे करार असल्याने बरसणाऱ्या पावसाच्या १ मिमीमागे ५० रुपये वाढतील अथवा घटतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.०० ते रात्री ११.३०/११.५५ दरम्यान हे व्यवहार सुरू राहणार असून सध्या जून ते सप्टेंबर असे चार महिन्यांचे वायदे करार उपलब्ध असतील.
