मुंबई : मागील दोन महिन्यांत मंदावलेली नवीन डीमॅट खाती उघडण्याची गती जूनमध्ये वाढली आणि ती चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. व्यापक बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह पुन्हा वाढला आहे.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये एकूण २५.७ लाख डीमॅट खाती उघडली गेली. फेब्रुवारी २०२६ नंतरची (जेव्हा २८.१ लाख खाती उघडली गेली होती) ही सर्वाधिक संख्या आहे. त्याआधीच्या मे महिन्यात २१.७ लाख आणि गेल्या वर्षी जूनमध्ये २५.२ लाख खाती उघडली गेली होती.
सीडीएसएलने २०.९ लाख खाती जोडली, जी त्यांची चार महिन्यांतील सर्वाधिक मासिक वाढ होती; तर एनएसडीएलने ४.८ लाख खाती उघडली, जी ११ महिन्यांतील सर्वाधिक संख्या होती. डीमॅट खात्यांची एकूण संख्या २३.१६ कोटींच्या पुढे गेली आहे; ही संख्या मागील महिन्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी आणि वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १६.३ टक्क्यांनी अधिक आहे.
एप्रिलच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात, विशेषतः मिड-कॅप, स्मॉल-कॅप आणि मायक्रो-कॅप शेअर्समध्ये झालेली जोरदार तेजी पाहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित झाले. बाजारातील या तेजीचा लाभ घेण्याच्या उद्देशाने अनेकांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, एप्रिलमध्ये तेजी सुरू होऊनही, पहिल्या दोन महिन्यांत नवीन डीमॅट खाती उघडण्याचे प्रमाण मर्यादित राहिले होते. एप्रिलमध्ये सुमारे २२.३ लाख आणि मे महिन्यात २१.७ लाख खाती उघडली गेली होती, त्यानंतर जूनमध्ये या संख्येत मोठी वाढ झाली.
एप्रिलच्या सुरुवातीपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी सुमारे ८ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर व्यापक बाजाराने त्याहून अधिक चांगली कामगिरी केली आहे. बीएसई १५० मिड-कॅप निर्देशांक १८ टक्क्यांनी, बीएसई २५० स्मॉल-कॅप २२ टक्क्यांनी आणि बीएसई २५० मायक्रो-कॅप निर्देशांक ३१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
व्यापक बाजारातील तेजीव्यतिरिक्त, इराण आणि इस्रायलमधील तणाव निवळणे, खनिज तेलाच्या किमती आलेली नरमाई आणि व्यापक आर्थिक परिस्थिती (मॅक्रो-इकॉनॉमिक कंडिशन्स) यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच नॅस्डॅकवरील तंत्रज्ञान शेअर आणि दक्षिण कोरियातील एआय-संबंधित शेअरमधील वाढती अस्थिरता यामुळे भारतीय शेअरचे आकर्षणही तुलनेने वाढले आहे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेले पोषक निर्णय तसेच भारतीय बाजारपेठेची लवचिकता व स्थिरता यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. ‘क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट्स’ (क्यूआयपी), आंशिक समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) आणि ‘ब्लॉक डील्स’ यांच्या माध्यमातून निधी उभारणीच्या प्रक्रियेत झालेली सुधारणा, तसेच प्रारंभिक समभाग विक्रीमुळे (आयपीओ) बाजारातील हळूहळू होणारी पुनरुज्जीवनाची प्रक्रिया, या गोष्टींनीही गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावनेला बळ दिले आहे.
रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि भारतीय बाजाराची दाखवलेली लवचिकता पाहता, येत्या काळातही किरकोळ गुंतवणूकदारांचा हा ओघ असाच कायम राहण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
