1 April 2026 New Rules impact on Income Tax and daily banking transactions: मार्च महिना आता संपत आला असून, पुन्हा एकदा नवीन आर्थिक वर्षासोबत नवीन आर्थिक नियमही येत आहेत. १ एप्रिल २०२६ पासून आयकर (Income Tax) ते रेल्वे तिकिटांपर्यंत अनेक बदल लागू होणार आहेत आणि यातील काही बदल तुमच्या दैनंदिन खर्चावर व नियोजनावर नकळतपणे परिणाम करू शकतात. यामुळेच १ एप्रिल २०२६ पासून नक्की काय बदल होत आहे, याचा आढावा घेऊया.
नवीन आयकर कायदा
यंदाच्या आर्थिक वर्षात होणारा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ‘आयकर कायदा, २०२५’ (Income Tax Act, 2025). १ एप्रिल २०२६ पासून १९६१ च्या जुन्या कायद्याच्या जागी नवीन आयकर दायदा लागू होईल.
करविषयक नियमांचे पालन करणे अधिक सुलभ करण्यावर या कायद्याचा मुख्य भर आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे वापरल्या जाणाऱ्या भाषेतील बदल. ‘निर्धारण वर्ष’ (Assessment Year) आणि ‘मागील वर्ष’ (Previous Year) या व्याख्यांऐवजी, आता या कायद्यात केवळ एकाच ‘कर वर्ष’ (Tax Year) या व्याख्येचा वापर केला जाईल. अनेक करदात्यांसाठी, यामुळे आयकर विवरणपत्र (Returns) दाखल करण्याची प्रक्रिया कमी गुंतागुंतीची आणि अधिक स्पष्ट होण्यास मदत होऊ शकेल.
TDS कपात ट्रॅक करण्यासाठी ‘फॉर्म १३०’
टीडीएस कपात ट्रॅक करण्यासाठी आता ‘फॉर्म १३०’चा वापर करण्यात येणार आहे. हा फॉर्म नोकरदारांना त्यांच्या नियोक्त्यांकडून (संस्था) दिला जाईल, तर काही विशिष्ट बँका पात्र ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म उपलब्ध करून देतील. एकदा टीडीएसची कपात होऊन ती रक्कम जमा झाली की, हे प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य ठरते, ज्यामुळे करदात्यांना त्यांच्या कर-कपातींचा अधिक स्पष्टपणे ट्रॅक करणे शक्य होते.
एटीएम आणि बँक मर्यादांमधील बदल
बँका त्यांच्या काही दैनंदिन नियमांमध्ये सुधारणा करत आहेत. या बदलांचा परिणाम तुम्हाला तुमच्या पैशांचा वापर कसा करता येईल, यावर होऊ शकतो.
एचडीएफसी बँक, रोख पैसे काढण्यासीठी यूपीआय आधारित एटीएमसुविधेचा पाच वेळा मोफत वापर केल्यानंतर, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक (PNB) काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठी पैसे काढण्याची मर्यादा कमी करत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ही मर्यादा आता ५०,००० ते ७५,००० रुपयांच्या दरम्यान असेल, जी पूर्वीच्या तुलनेत कमी करण्यात आली आहे.
जर तुम्ही रोख पैशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असाल, तर या परिस्थितीसाठी तुम्हाला अधिक चांगल्या नियोजनाची आवश्यकता भासू शकते.
रेल्वे तिकीट रद्द करण्याचे नियम अधिक कठोर
जर तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल, तर हा बदल तुमच्यासाठी लक्षात घेण्यासारखा आहे. भारतीय रेल्वेने आता नियमांमध्ये बदल केला असून, आधी गाडी सुटण्याच्या ४ तास आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास परतावा मिळत असे, मात्र आता गाडी सुटण्याच्या ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
गाडी सुटण्याच्या ८ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास ५०% परतावा मिळेल, तर २४ ते ७२ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास २५% रक्कम कापली जाईल.
अगदी ७२ तासांहून अधिक काळ आधी तिकीट रद्द केले तरीही, लागू असलेल्या शुल्कानुसार केवळ अंशतः परतावा दिला जाईल.
पॅन कार्ड अर्जाचे नियम
पॅन कार्डसाठी अर्ज करताना आता जन्म तारखेचा अधिक स्पष्ट पुरावा सादर करणे अनिवार्य असेल. १ एप्रिलपासून, यासाठी केवळ ‘आधार कार्ड’ पुरावा म्हणून पुरेसा ठरणार नाही. अर्जदारांना इयत्ता १० वीचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागतील. अधिकृत नोंदींची अचूकता सुधारणे, हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.
