100 Crore Deposited In Bank Account : एलपीजी गॅस सिलेंडरची ५०० रुपयांची सबसिडी तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेलेल्या पश्चिम बंगालमधील एका अत्यंत गरीब महिलेच्या खात्यात तब्बल ९९ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९७ रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. १०० कोटींना केवळ ३ रुपये कमी असणारी ही अवाढव्य रक्कम पाहून बँक कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. बँकेने तत्काळ खाते गोठवले असून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घरगुती गॅसची सबसिडी तपासताना उघडकीस आला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतळी जामतला भागात कश्मीरा शेख ही ३६ वर्षीय महिला राहते. कश्मीरा या आपल्या एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या होत्या. मात्र, तिथल्या बँक कर्मचाऱ्याने जेव्हा त्यांचे खाते तपासले, तेव्हा त्यांच्या खात्यातील ही भलीमोठी रक्कम पाहून त्यालाही धक्का बसला.

१०० कोटींमुळे कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ?

कश्मीरा शेख यांचे पत्र्याचे कच्चे घर असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबासह राहतात. पतीच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी जरीच्या धाग्यांचे भरतकाम करतात. त्यांचे पती पिशव्या शिवण्याचे काम करतात. खात्यात १०० कोटी रुपये आल्यामुळे बँकेने तत्काळ खाते गोठावले आहे. परिणामी कुटुंबाचे एकमेव हक्काचे बँक खाते गोठवले गेल्यामुळे आता या कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोलकात्यातील दुसऱ्या महिलेच्या खात्यात ४७ कोटी जमा!

बँक खात्याच अचाकन कोट्यवधी रुपये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कोलकात्यातील बेलेघाटा भागात ‘क्लाउड किचन’ चालवणाऱ्या नुपूर गुप्ता यांच्या बँक खात्यातही अचानक ४७ कोटी रुपये जमा झाले. नुपूर गुप्ता यांनी शुक्रवारी या संशयास्पद व्यवहाराची माहिती बँकेला दिली. या घटनेनंतर पोलीस, संबंधित बँक आणि प्राप्तिकर विभाग यांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बँकेचा सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक बिघाड?

पश्चिम बंगालमधील विविध बँकांच्या खात्यांमध्ये अचानक अशा प्रकारे कोट्यवधी रुपये जमा होण्यामागे ‘सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड’ कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. मात्र, हा तांत्रिक बिघाड नेमका कसा झाला आणि राज्यातील इतर किती ग्राहकांच्या खात्यांवर असा परिणाम झाला आहे, यावर बँकेने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही.