1997 Asian Financial Crisis: गेल्या काही महिन्यांपासून जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात आता अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील वाढता परतावा, जपानी चलन येनची झालेली घसरण आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबतचा मोठ्या प्रमाणावरील आशावाद या आर्थिक परिस्थितीचे १९९७ मधील विनाशकारी आशियाई आर्थिक संकटापूर्वीच्या परिस्थितीशी अस्वस्थ करणारे साम्य दिसून येत आहे. १९९७ मधील आशियाई आर्थिक संकटामुळे अनेक सरकारे पाडली होती. याचबरोबर अनेक दशकांची आर्थिक प्रगती नष्ट केली होती.
याबाबत एचएसबीसीचे (HSBC) मुख्य अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक न्यूमन ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आजची आर्थिक परिस्थिती आणि १९९७ च्या आर्थिक संकटास कारणीभूत ठरलेली परिस्थिती यांच्यातील लक्षणीय साम्य स्पष्ट केले आहे.
न्यूमन यांच्या मते आशियासमोरील मुख्य धोका आता कमकुवत बँकिंग प्रणाली नसून, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) हार्डवेअरसाठी अमेरिकेच्या मागणीवर असलेले पूर्ण अवलंबित्व आहे. त्या काळातील आणि सध्याच्या परिस्थितीतील ऐतिहासिक साम्य दुर्लक्षित करण्यासारखे नसल्यासे न्यूमन यांनी नमूद केले आहे. सीएनबीसीच्या एका वृत्तात याचा उल्लेख आहे.
१९९७ च्या आर्थिक संकटपूर्व काळात अमेरिकेच्या १०-वर्षीय सरकारी रोख्यांच्या परताव्याचा दर ऑक्टोबर १९९३ मधील सुमारे ५ टक्क्यांवरून नोव्हेंबर १९९४ मध्ये जवळपास ८ टक्क्यांपर्यंत वाढला होता आणि एप्रिल १९९७ पर्यंत तो ७ टक्क्यांच्या आसपास होता. आज फेब्रुवारी २०२६ पासून या दरात सुमारे ८० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊन तो ४.७९ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे.
चलन दरातील चढ-उतार हा धोक्याचा दुसरा संकेत ठरत आहे. एप्रिल १९९५ ते एप्रिल १९९७ या काळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जपानी येनचे मूल्य सुमारे ५५ टक्क्यांनी घसरले होते. ते ८० वरून १३० पर्यंत खाली आले होते. सध्याच्या चक्रातही, येनच्या मूल्यात ५७ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये प्रति डॉलर जवळपास १०३ येन असलेला दर जुलैमध्ये १६३ च्या नीचांकी पातळीवर गेला होता. यामुळे अमेरिका आणि जपान यांना येनचा दर १६० च्या आसपास स्थिर करण्यासाठी दुर्मिळ अशा संयुक्त हस्तक्षेपाचा निर्णय घ्यावा लागला, असे सीएनबीसीच्या वृत्तात नमूद केले आहे.
न्यूमन यांनी नमूद केलेले शेवटे साम्य हे तंत्रज्ञानाविषयीचा उत्साह आहे. १९९० च्या दशकाच्या मध्यात इंटरनेट क्रांतीमुळे आशियातील अशा उत्पादन केंद्रांकडे भांडवल वळाले जी केंद्रे या तेजीला आधार देणारे हार्डवेअर पुरवत होती. आज ‘एआय’ (AI) मधील गुंतवणुकीचे चक्रही अगदी तसेच काम करत आहे. यामुळे दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर यांसारख्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देशांकडे प्रचंड मागणी वाढत आहे.
न्यूमन यांचा इशारा
“१९९० च्या दशकातील आर्थिक असुरक्षिततेऐवजी, आशियाला आता मागणीच्या असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे”, असे न्यूमन म्हणाले.
जर वाढलेल्या अमेरिकन सरकारी रोख्यांचा परतावा आणि वाढत्या कर्ज खर्चामुळे अमेरिकन हायपरस्केलर्सना डेटा सेंटरवरील खर्च कमी करण्यास भाग पडले किंवा येनच्या अस्थिरतेमुळे बाजारपेठा अस्थिर झाल्या, तर आशियाच्या निर्यातीला थेट फटका बसू शकतो, असेही या सीएनबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. याचे परिणाम बँकांच्या ट्रेडिंग फ्लोअर्सवरील भीतीतून नव्हे, तर या प्रदेशातील प्रमुख चिप उत्पादकांच्या ऑर्डर बुक्समध्ये शांतपणे होणाऱ्या तीव्र घसरणीतून दिसून येतील.
