8th Pay Commission : देशातील १ कोटी २० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचारी संघटनेने ८ व्या वेतन आयोगासाठी आपले ५१ पानांचे विस्तृत मागणीपत्र सादर केले आहे. यामध्ये ‘फिटमेंट फॅक्टर’ ३.८३३ करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

किमान पगार १८ हजारावरून थेट ६९ हजारावर?

जेसीएमचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हे निवेदन वेळेपूर्वीच सादर करण्यात आले आहे. या निवेदनातील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे ‘फिटमेंट फॅक्टर’मध्ये वाढ करणे. सध्या ७ व्या वेतन आयोगानुसार हा फॅक्टर २.५७ आहे, तो वाढवून ३.८३३ करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांचे सध्याचे किमान १८,००० रुपये वेतन वाढवून थेट ६९,००० रुपये होईल. तसेच कमाल वेतन श्रेणीतील पगार २,१५,००० रुपयांवर निश्चित करण्याचा प्रस्तावही यात देण्यात आला आहे.

कुटुंबाच्या व्याख्येत बदल

कर्मचारी संघटनेने केवळ पगारावरच नाही, तर सामाजिक सुरक्षेवरही भर दिला आहे. सध्याच्या महागाईचा विचार करून ‘कुटुंब युनिट’ची संख्या ३ वरून ५ वर नेण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबाच्या व्याख्येत आता पालकांचाही समावेश करावा, अशी मागणी आहे. यामुळे भत्ते आणि इतर लाभांची गणना करताना कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

वार्षिक वेतनवाढीत बदल करावा

पगारातील वार्षिक वाढीबाबतही एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्या मिळणारी ३ टक्के वार्षिक वेतनवाढ आता ६ टक्के करावी, अशी मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात दरवर्षी सन्मानजनक वाढ होईल. यासोबतच, पगार रचनेतील गुंतागुंत कमी करण्यासाठी अनेक श्रेणींचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पदोन्नती आणि वेतन निश्चितीची प्रक्रिया अधिक सोपी होऊन त्याचा फायदा मोठ्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळेल.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

अनेक कर्मचाऱ्यांना प्रश्न पडतो की हा फॅक्टर काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे तर, हा एक असा ‘गुणांक’ आहे ज्याचा वापर नवीन मूळ वेतन ठरवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ जर सध्या तुमचा मूळ पगार १८,००० असेल आणि सरकारने ३.८३३ चा फॅक्टर मान्य केला, तर तुमचा नवीन पगार १८००x३.८३३ = ६८,९९४ रुपये (सुमारे ६९,०००) रुपये होईल.

८ व्या वेतन आयोगाची सद्यस्थिती?

केंद्र सरकारने अद्याप ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, कर्मचारी संघटनांचा दबाव वाढत आहे. महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने आता नवीन वेतन आयोगाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. आगामी काळात सरकार या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हा लेख राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचारी गटाने सादर केलेले निवेदन आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनांवर आधारित आहे. नमूद केलेले प्रस्ताव केवळ शिफारसी असून त्यांना केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही. वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनातील प्रत्यक्ष बदल हे वेतन आयोगाच्या शिफारसींवर आणि सरकारने त्यांना दिलेल्या मान्यतेवर अवलंबून असतील.)