8th Pay Commission Salary Arrears : देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या आयोगाच्या शिफारसी वेळेत लागू न झाल्यास कर्मचाऱ्यांना सुमारे १८ ते २४ महिन्यांची म्हणजेच तब्बल २ वर्षांची थकबाकी एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, एकाच आर्थिक वर्षात दोन वर्षांची थकबाकी मिळाली तर टॅक्सचा बोजा वाढणार का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

थकबाकीवर जास्त टॅक्स का बसू शकतो?

आयकर नियमांनुसार, थकबाकीची रक्कम ज्या वर्षात मिळते, त्याच वर्षाच्या उत्पन्नात ती जोडली जाते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा टॅक्स स्लॅब २०% असेल, तर थकबाकीची मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्याचे उत्पन्न थेट ३०% च्या सर्वोच्च टॅक्स स्लॅबमध्ये जाऊ शकते. म्हणजेच, कोणतीही चूक नसताना केवळ पगार उशिरा मिळाल्यामुळे कर्मचाऱ्याला जास्त टॅक्स भरावा लागू शकतो.

टॅक्स वाचवण्यासाठी ‘कलम ८९(१)’ ठरतेय ‘ढाल’

कर्मचाऱ्यांवर असा अन्याय होऊ नये म्हणून आयकर कायदा, १९६१ मध्ये ‘कलम ८९(१)’ ची तरतूद करण्यात आली आहे. ‘क्लियरटॅक्स’च्या कर तज्ज्ञ सीए चांदनी आनंदन यांनी याबद्दल सोप्या शब्दात मार्गदर्शन केले आहे.

  • चालू वर्षाचा टॅक्स काढा : थकबाकी पकडून आणि थकबाकी न पकडता चालू वर्षात किती टॅक्स होतोय, यातील फरक काढा.
  • मागील वर्षांचा टॅक्स काढा : ही थकबाकी ज्या वर्षांची आहे (उदा. २०२६ आणि २०२७), त्या वर्षांच्या मूळ उत्पन्नात ती रक्कम जोडून जुन्या दराने टॅक्स किती झाला असता, ते काढा.
  • फरक तपासा : जर चालू वर्षातील टॅक्सचा फरक मागील वर्षांच्या टॅक्स फरकापेक्षा जास्त असेल, तर ती अतिरिक्त रक्कम तुम्हाला ‘कलम ८९(१)’ अंतर्गत वजावट म्हणून मिळते.
  • थोडक्यात काय तर कलम ८९(१) हे थकबाकीला भूतकाळातील संबंधित वर्षांमध्ये विभागून टॅक्सचा बोजा ‘न्यूट्रल’ म्हणजेच सामान्य करते.

जुनी टॅक्स पद्धत की नवी? कोणती फायदेशीर ठरेल?

  1. याचे कोणतेही एकच उत्तर नाही, कारण ते प्रत्येक कर्मचाऱ्याच्या एकूण पगारावर आणि गुंतवणुकीवर अवलंबून असते.
  2. जुन्या टॅक्स पद्धतीचा फायदा : ज्या कर्मचाऱ्यांनी होम लोन, ८०सी (80C), ८०डी (80D) किंवा एचआरए (HRA) अंतर्गत मोठी गुंतवणूक केली आहे, त्यांना जुनी पद्धत फायदेशीर ठरू शकते, कारण या वजावटींमुळे थकबाकीचा टॅक्सवर होणारा परिणाम कमी होतो.
  3. नव्या टॅक्स पद्धतीचा फायदा : ज्या कर्मचाऱ्यांची गुंतवणूक कमी आहे आणि पगार रचना सोपी आहे, त्यांना नव्या पद्धतीतील कमी कर दरांचा फायदा मिळू शकतो.

टॅक्सचा मोठा फटका टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय करावे?

सीए चांदनी आनंदन यांच्या मते, वेतन आयोगाची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ खालील पावले उचलली पाहिजेत.

  • फॉर्म १०ई भरणे अनिवार्य : जर तुम्हाला कलम ८९(१) नुसार टॅक्स सवलत हवी असेल, तर आयटी रिटर्न फाईल करण्यापूर्वी ‘फॉर्म १०ई’ ऑनलाइन भरणे अत्यंत गरजेचे आहे. हा फॉर्म भरला नसेल तर प्राप्तिकर विभाग ही सवलत नाकारू शकतो.
  • थकबाकी स्टेटमेंट गोळा करा : तुमच्या ऑफिसमधून थकबाकीचे वर्षनिहाय वर्गीकरण असलेले स्टेटमेंट मागवून घ्या.
  • गुंतवणुकीचे नियोजन : मोठी थकबाकी मिळणार असल्याने चालू वर्षात ८०सी, एनपीएस किंवा आरोग्य विम्यामध्ये कमाल मर्यादेपर्यंत गुंतवणूक करून टॅक्स स्लॅब कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • फॉर्म १६ तपासा : तुमच्या फॉर्म १६ मध्ये थकबाकी आणि मिळालेली टॅक्स सवलत योग्य प्रकारे दाखवली आहे की नाही, याची खात्री करून घ्या.