8th Pay Commission Salary Hike and Fitment Factor Implementation Date: आठव्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना होऊन एक वर्ष उलटले आहे, परंतु केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाही. यामध्ये पगारात किती वाढ होईल? फिटमेंट फॅक्टर किती असेल? आणि नवीन पगार रचना कधीपासून लागू होईल? या तीन महत्त्वांच्या प्रश्नांचा समावेश आहे.

३ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे स्थापन झालेल्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे पगार, भत्ते आणि निवृत्तीवेतनांचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आयोगाच्या शिफारशींचा लाभ ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे ६९ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळण्याची अपेक्षा आहे.

आयोगाने आपली पूर्वतयारी सुरू केली असली, तरी अंतिम ‘फिटमेंट फॅक्टर’, पगारवाढीचे प्रमाण आणि अंमलबजावणीची कालमर्यादा यांसारख्या महत्त्वाच्या तपशिलांची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

आठव्या वेतन आयोगांतर्गत पगारात किती वाढ होईल?

आठव्या वेतन आयोगाबाबतच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या अपेक्षांपैकी एक म्हणजे मूळ पगारात होणारी वाढ. पुढील वेतन वाढ किती मोठी असू शकते हे समजून घेण्यासाठी, गेल्या काही वर्षांत सरकारी वेतन पद्धतीत कशा प्रकारे बदल झाले आहेत, हे पाहणे उपयुक्त ठरेल.

याबाबत बोलताना, Bankbazaar चे सीईओ अधिल शेट्टी, “स्वातंत्र्यानंतरच्या सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ हे दर्शविते की पगाराची रचना आणि त्याच्या पातळीमध्ये आतापर्यंत खूप बदल झाले आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतन पहिल्या वेतन आयोगाअंतर्गत ५५ रुपयांवरून सातव्या वेतन आयोगाअंतर्गत १८,००० रुपये झाले आहे.” याचा इंडिया टु़डेच्या वृत्तात उल्लेख आहे.

फिटमेंट फॅक्टर किती असेल?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगांतर्गत किती फिटमेंट फॅक्टर असेल याची उत्सुकता आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार आणि सेवानिवृत्तांचे निवृत्तीवेतन निश्चित करण्यात हा गुणक महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण जितका जास्त फिटमेंट फॅक्टर तितकी जास्त पगारवाढ हे गणित आहे.

पगारवाढ कधीपासून लागू होईल?

आठव्या वेतन आयोगाबाबतचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न कालमर्यादेबाबत आहे. कर्मचाऱ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, आयोग आपल्या शिफारसी कधी सादर करेल, सरकार त्यांना कधी मंजुरी देईल आणि नवी पगारवाढ त्यांच्या हातात कधी पडेल.