Abhinay Maths Net Worth : भारतात सरकारी नोकरीला प्रचंड महत्त्व आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्र आणि राज्यातील विविध पदांसाठी प्रयत्न करतात. एक नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुणांची उमेदीची वर्षे खर्च होतात. अशा परिस्थितीत कष्टाने मिळवलेली सरकारी नोकरी सोडली तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अभिनय असं या तरुणाचे नाव असून त्याने सरकारी नोकरी सोडून युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरी सोडल्याने नातेवाई आणि मित्रांनी अभिनयला भिकेचे डोहाळे लागल्याचे म्हटले. पण, आज हाच अभियन देशात ‘अभिनय सर’ म्हणून लोकप्रिय आहे. ‘अभिनय मॅथ्स’ या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक साम्राज्य उभे करणाऱ्या अभिनय शर्मा यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

५ वेळा मिळालेली सरकारी नोकरी सोडली

३४ वर्षीय अभिनय शर्मा यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत तब्बल ५ वेळा ‘SSC CGL’ ही कठीण सरकारी परीक्षा उत्तीर्ण केली होती. या काळात त्यांनी वेगवेगळ्या सरकारी पदांवर कामही केले. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच शिकवण्याची आवड होती. अखेर त्यांनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ अध्यापनात उतरण्याचा निर्णय घेतला.

Abhinay Maths Net Worth
अभिनय सर विद्यार्थ्यांना शिकवताना (छायाचित्र – फेसबुक)

नोकरी सोडून यूट्यूब चॅनेलची सुरुवात

ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी ‘Abhinay Maths’ या यूट्यूब चॅनेलची सुरुवात केली. त्यांच्या शिकवण्याच्या सोप्या पद्धतीमुळे अवघ्या ८ महिन्यांत त्यांच्या चॅनेलने १० लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा पार केला. शैक्षणिक क्षेत्रात एवढ्या वेगाने हा टप्पा गाठणारे ते सुरुवातीच्या काही मोजक्या युट्युबर्सपैकी एक ठरले. यूट्यूबसोबतच त्यांनी केवळ १५० विद्यार्थ्यांना ऑफलाइन कोचिंग क्लास सुरू केला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात जेव्हा त्यांनी नवीन बॅचची घोषणा केली, तेव्हा १५० च्या जागेवर तब्बल ५०० विद्यार्थी आले. माझ्या क्लासमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्याचे अभिनयने एका मुलाखतीत सांगितले.

१० लक्झरी गाड्या आणि लक्झरी फ्लॅट्स

यूट्यूब आणि ऑफलाइन क्लासमधून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचे सर्व कर्ज फेडले. २०१८ मध्ये त्यांनी आपली पहिली लक्झरी कार ‘मर्सिडीज-बेंझ’ खरेदी केली. आपल्या आर्थिक प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणतात, “एक काळ असा होता जेव्हा लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हसायचे, आज मी शांत राहून माझ्या यशाने त्यांना उत्तर दिले आहे. मी माझी सर्व स्वप्ने जगलो आहे. आज मी एकदा घातलेले कपडे पुन्हा घालत नाही, अशी परिस्थिती आहे.

नोएडामध्ये अनेक प्लॉट्स अन् विनामूल्य घरे

२०२२ मध्ये प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांच्या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिनय शर्मा यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला होता. त्यांच्याकडे १० वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या आलिशान गाड्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या अवघ्या एक वर्षाच्या मुलासाठीही त्यांनी दोन आसनी कार घेतली आहे. ग्रेटर नोएडामध्ये त्यांचे इतके प्लॉट्स आणि फ्लॅट्स आहेत की त्यांना स्वतःलाही त्यांची अचूक संख्या माहीत नाही. या घरांमधून ते कोणतेही भाडे घेत नाहीत. त्याऐवजी त्यांनी गरजूंना तिथे मोफत राहण्याची परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

तासाला १.२९ लाख रुपये फी

करिअरच्या सुरुवातीला अभिनय सरांना शिकवण्यासाठी प्रति तास अवघे ६५० रुपये मिळायचे. मात्र, आज एडटेक क्षेत्रातील ते सर्वात महागडे शिक्षक मानले जातात. आज जर कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्थेला किंवा एडटेक प्लॅटफॉर्मला त्यांच्याशी दीर्घकालीन भागीदारी करायची असेल, तर त्यांना ‘अपफ्रंट जॉइनिंग फी’ म्हणून तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात. याशिवाय त्यांच्या नियमित अध्यापन सत्रांसाठी ते १ लाख २९ हजार रुपये प्रति तास एवढे प्रचंड शुल्क आकारतात. एका सामान्य सरकारी शिक्षकापासून ते भारतातील सर्वात श्रीमंत शैक्षणिक उद्योजकांपैकी एक बनण्याचा अभिनय शर्मा यांचा हा प्रवास आज देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.