Adani Group VTTI Acquisition News : गेल्या काही वर्षात अदाणी समूहाने विविध क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार केला आहे. जागतिक उर्जेची गरज पाहाता अदाणी समूहाने आता युरोपच्या ऊर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. रोटरडॅम (नेदरलँड्स) येथील प्रसिद्ध विटोल टँक टर्मिनल्स इंटरनॅशनल (VTTI) या ऊर्जा साठवणूक समूहाच्या अधिग्रहणासाठी अदाणी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यात होणाऱ्या अडथळ्यांमुळे अशा प्रकल्पांचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर हा व्यवहार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हीटीटीआय (VTTI) या डच कंपनीचे एकूण मूल्यांकन सुमारे ३ अब्ज युरो (२५,००० कोटी रुपयांहून अधिक) असण्याचा अंदाज आहे. अदानी समूह या कंपनीतील भागीदारी खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.

व्हीटीटीआय प्रकल्पाची मालकी कोणाकडे?

सध्या VTTI या कंपनीची मालकी तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियातील IFM इन्व्हेस्टर्स आणि कमोडिटीज दिग्गज विटॉल एस.ए. यांच्याकडे प्रत्येकी ४५% हिस्सा आहे, तर अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीकडे (Adnoc) उर्वरित १० टक्के हिस्सा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Adnoc कंपनी या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार करत आहे, तर IFM आणि Vitol या संभाव्य व्यवहारात आपला हिस्सा कमी करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतच्या चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून इतर आंतरराष्ट्रीय कंपन्याही शर्यतीत असल्याने हा करार अंतिम होईलच असे निश्चित सांगता येत नाही.

कंपनीचे जागतिक नेटवर्क

व्हीटीटीआय कंपनीकडे जगभरात इंधन आणि रसायनांच्या साठवणुकीसाठी टर्मिनल्सचे विशाल जाळे आहे. यामध्ये पारंपरिक जीवाश्म इंधनासह, जैवइंधन आणि द्रव इंधनांचा समावेश आहे.

अदाणी समूहासाठी या कराराचे महत्त्व

अदाणी समूहाचे पोर्टफोलिओ आधीच बंदरे, विमानतळ, डेटा सेंटर, खाणकाम, संरक्षण आणि वीज पायाभूत सुविधांमध्ये विस्तारलेले आहे. VTTI मधील भागीदारी मिळाल्यास अदाणी समूहाच्या जागतिक विस्ताराला मोठा वेग मिळू शकतो. यामुळे युरोपियन ऊर्जा बाजारात भक्कम स्थान निर्माण होईल.

उर्जा साठवणूक कंपनी का महत्त्वाची?

आधी रशिया-युक्रेन आणि आता मध्यपूर्वेतील संघर्ष यामुळे जागतिक उर्जा पुरवठा साखळी वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या काही दिवसात यमेन-इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील उर्जा कंपन्यांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. अशा परिस्थितीत उर्जा साठवणूक कंपन्यांचे महत्त्वा वाढले आहे.