पीटीआय, नवी दिल्ली

अदानी समूहातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सुमारे दोन टक्के समभागांची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली. अदानी पोर्ट्सच्या प्रवर्तक गटातील संस्थेने सुमारे ७,४८६ कोटी रुपयांना या समभागांची अमेरिकेतील ‘कॅपिटल ग्रुप’ला विक्री करण्यात आली.

हिस्सेदारी विक्रीनंतर, मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात अदानी पोर्टचा समभाग १.१० टक्क्यांनी घसरून १७२५ रुपयांवर बंद झाला. आकडेवारीनुसार, अदानी पोर्ट्सच्या प्रवर्तक गटातील संस्था असलेल्या ‘वर्ल्डवाइड इमर्जिंग मार्केट होल्डिंग लिमिटेड’ने सोमवारी तीन टप्प्यांत एकूण ४.५८ कोटी समभागांची विक्री केली. हे सरासरी १६३२.४५ रुपये प्रतिसमभाग या दराने विकले गेले, ज्यामुळे या संपूर्ण व्यवहाराचे एकूण मूल्य ७,४८६.२० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

या व्यवहारानंतर, कंपनीमध्ये ‘वर्ल्डवाइड इमर्जिंग मार्केट होल्डिंग लिमिटेड’चा हिस्सा ३.७४ टक्क्यांवरून कमी होऊन १.७५ टक्क्यांवर आला. तसेच, अदानी प्रवर्तक गटाची एकूण भागभांडवल मालकी (शेअरहोल्डिंग) देखील ६८.०२ टक्क्यांवरून घसरून ६६.०३ टक्क्यांवर आली.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा समभाग १७५७.४० रुपयांच्या ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीवरून खाली घसरला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ३.७२ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) वर्ष २०२४ मध्ये बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्समध्ये स्थान मिळवले आहे. शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या शेअर किंमत हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केल्याच्या काही महिन्यांनंतर अदानी समूहाती कंपन्यांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कोसळल्या होत्या. मात्र त्यावेळी अदानी समूहाने कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.