Adani Vizhinjam Port Share Sale Controversy: केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी गुरुवारी, राज्य सरकारची बंधनकारक असलेली पूर्वपरवानगी न घेता विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरातील आपला ४९ टक्के हिस्सा विकण्याचा करार करण्याची ‘हिंमत’ अदाणी समूह कसा करू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत बोलताना विजयन म्हणाले की, बंदराबाबत कंपनी आणि सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार, ‘अदाणी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ (AVPPL) मधील २५ टक्के हिस्सा विकण्यास राज्य प्रशासनाच्या पूर्वपरवानगीच्या अधीन राहूनच परवानगी देण्यात आली होती.

तरीही, विझिंजम बंदराचे कंत्राटदार असलेल्या ‘एव्हीपीपीएल’ने (AVPPL) कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, १३ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेले आपले ४९ टक्के शेअर्स स्वित्झर्लंडस्थित मेडिटेरेनियन शिपिंग कंपनीला (MSC)हस्तांतरित करण्याचा करार केला आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठी शिपिंग आणि लॉजिस्टिक्स कंपनी आहे.

“त्यांनी असे करण्याचे धाडस कसे केले? मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, कारण बंदरे विभागाचा कार्यभारही त्यांच्याकडेच आहे. शेअर्स हस्तांतरणाची ही प्रक्रिया बेकायदेशीर असून ती सरकारसोबतच्या कराराचे उल्लंघन करणारी आहे. अदाणींच्या या काराराच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणती पावले उचलणार आहे, हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे”, असे माजी मुख्यमंत्री विजयन म्हणाले.

“जर एमएससी या जहाजवाहतूक कंपनीने बंदराचे नियंत्रण हाती घेतले, तर तिथे त्यांची मक्तेदारी निर्माण होऊ शकते. कारण शेअर्सच्या हस्तांतरणानंतर बंदरावरील नियंत्रणाचे मुख्य अधिकार त्यांच्याकडे असतील”, असा दावाही विजयन यांनी केला.

अदाणी समूह आणि एमएससी यांच्यातील करार

जगातील सर्वात मोठी स्वित्झर्लंडस्थित जहाजवाहतूक आणि लॉजिस्टिक्स कंपनी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (एमएससी) अदाणी समूहाच्या केरळमधील विझिंजम बंदरात सुमारे १.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून ४९ टक्के हिस्सा संपादन करेल, अशी माहिती अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने मंगळवारी दिली होती.

एमएससी ही खरेदी आपल्या ‘टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ या उपकंपनीद्वारे करणार आहे. या करारानुसार, टर्मिनल इन्व्हेस्टमेंट १.३९७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल. या व्यवहारामुळे विझिंजम बंदराचे एकूण मूल्यांकन २.८५ अब्ज डॉलरवर (सुमारे २७,००० कोटी) पोहोचले आहे. उर्वरित ५१ टक्के हिस्सा अदानी समूहाकडेच राहणार असल्याने बंदराचे नियंत्रण त्यांच्याकडेच कायम असेल.

जागतिक व्यापारात विझिंजमचे वाढते महत्त्व

विझिंजम हे भारताचे पहिले ‘डीप-ड्राफ्ट मेगा ट्रान्सशिपमेंट पोर्ट’ (खोल पाण्याचे कंटेनर अदलाबदल केंद्र) आहे, जे डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाले होते. आंतरराष्ट्रीय पूर्व-पश्चिम सागरी व्यापारी मार्गापासून हे बंदर अवघ्या १० सागरी मैल अंतरावर असल्याने याला प्रचंड भौगोलिक महत्त्व आहे. जागतिक वाहतुकीत मोठ्या जहाजांमधून आलेला माल या बंदरावर उतरवला जातो आणि तिथून तो छोट्या जहाजांद्वारे इतर देशांत किंवा देशांतर्गत बंदरांवर पाठवला जातो. दुबई किंवा सिंगापूरची बंदरे याच धर्तीवर चालतात.