Akash Ambani MD Jio Platforms: रिलायन्स समूहाच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ (Jio Platforms) या कंपनीने आपल्या ‘आयपीओ’ (IPO) प्रक्रियेपूर्वीच, आकाश अंबानी यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्स आपल्या आयपीओ (IPO) संदर्भातील कागदपत्रे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये सादर करेल, अशी अपेक्षा आहे. “आकाश एम. अंबानी यांची ९ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे”, असे ७ मे रोजी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यांच्या कार्यकाळात, जिओने २०१६ मध्ये लाँच झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आतच १० कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी केली होती. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीने ३०,००० कोटी रुपयांहून अधिक नफा आणि १.४६ लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.
ऑक्टोबर २०१४ पासून अंबानी हे ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या दूरसंचार विभागाचा भाग असलेल्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’च्या (RJIL) संचालक मंडळावर कार्यरत आहेत. जून २०२२ मध्ये, त्यांची ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’च्या अध्यक्षपदी बढती करण्यात आली होती.
कोण आहेत आकाश अंबानी?
आकाश अंबानी हे रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे सुपूत्र आहेत. रिलायन्स समूहाच्या संकेतस्थळानुसार, आकाश अंबानी यांनी अमेरिकेतील ‘ब्राउन युनिव्हर्सिटी’मधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.
ते जून २०२२ पासून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. तत्पूर्वी, ऑक्टोबर २०१४ पासून ते रिलायन्स जिओ इन्फोकॉम च्या संचालक मंडळावर अ-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.
जगप्रसिद्ध टाईम्स मासिक दरवर्षी जगातील विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तींची यादी तयार करते. याला ‘Time100 Next’ यादी म्हणतात. या यादीत २०२२ मध्ये रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी स्थान मिळवले होते. त्या वर्षी या यादीत स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय होते.
मुंबई इंडियन्स आणि आकाश अंबानी
उत्साही क्रीडाप्रेमी असलेल्या आकाश अंबानी यांची आयपीएल संघ ‘मुंबई इंडियन्स’च्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका आहे. मुंबई इंडियन्सची मालकी जरी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (रिलायन्स समूह) यांच्याकडे असली तरी, नीता अंबानी आणि आकाश अंबानी रिलायन्सच्या या क्रीडा पोर्टफोलिओचा भाग म्हणून या संघाचे व्यवस्थापन पाहतात.
