पुणे : अमेझॉन कंपनीने गेल्या वर्षी विक्रेत्यांसाठी ३०० रुपयांपर्यंतच्या उत्पादनांरील ‘रेफरल’ शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे गेल्या वर्षभरात ॲमेझॉनवरील महाराष्ट्रातील नवीन विक्रेत्यांच्या संख्येत ७५ टक्के वाढ झाली. यामुळे कंपनीने आता एक हजार रुपयांपर्यंतच्या उत्पादनांवरील ‘रेफरल’ शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अॅमेझॉन इंडियाच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे संचालक विक्रम देशपांडे यांनी दिली.
ॲमेझॉनवर सध्या महाराष्ट्रातील २ लाखांहून अधिक विक्रेते आहेत. आता ॲमेझॉनने आपल्या शून्य ‘रेफरल’ शुल्क योजनेची व्याप्ती दहा पटीने वाढवून २०२५ मधील १.२ कोटी उत्पादनांवरून आता १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांपर्यंत नेली आहे. या निर्णयाचा फॅशन, होम, किचन आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज यांसारख्या दैनंदिन श्रेणीतील विक्रेत्यांना मोठा फायदा होणार आहे.
एक हजार रूपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवरील शून्य ‘रेफरल’ शुल्क आणि ३०० रूपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांच्या ‘इझी शिप’ शुल्कातील २० टक्के कपात यामुळे विक्रेत्यांच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यामुळे विक्रेत्यांना एकूण शुल्कात ७० टक्क्यांपर्यंत बचत करण्यास मदत होत आहे.
याबाबत विक्रम देशपांडे म्हणाले की, ॲमेझॉनने ‘रेफरल’ शुल्क माफ केल्यानंतर केवळ दोन आठवड्यांत राज्यभरातील विक्रेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई यासारख्या शहरांमधील विक्रेत्यांनी त्यांच्या उत्पादनांची श्रेणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. शुल्कातून होणारी बचत ते पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतवत आहेत. ॲमेझॉनकडून शुल्कामध्ये कपात करण्यासह विक्रेत्यांसाठी सुलभ नोंदणी प्रक्रिया, कमी खर्चिक संरचना आणि अधिक चांगले व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत करणारी साधने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय)-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही विक्रेत्यांना व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहोत.
३५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना
अॅमेझॉनने २०३० पर्यंत भारतात ३५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. आतापर्यंत केलेल्या सुमारे ४० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीवर आधारित ही नवी गुंतवणूक प्रामुख्याने एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यातीतील वाढ आणि रोजगार निर्मिती या तीन धोरणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करेल, असे अॅमेझॉनने स्पष्ट केले आहे.
