Co-operative Life Insurance : सहकाराचा आता विमा क्षेत्रातही विस्तार होऊ घातला असून, केंद्र सरकार लवकरच एक नवीन सहकारी जीवन विमा कंपनी स्थापन करेल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात सोमवारी केली. सहकार मंत्रालयाच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, सहकार क्षेत्रातील ‘भारत टॅक्सी’ हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, येत्या दोन वर्षांत त्याचा विस्तार ५०० शहरांमध्ये केला जाईल. याच धर्तीवर आता विमा क्षेत्रातही सहकारी कंपनी आणली जात आहे. सध्या ‘इफ्को’ ही सहकारी संस्था जपानी कंपनीसोबत भागीदारी करून विमा व्यवसायात कार्यरत आहे, मात्र आता संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र जीवन विमा कंपनी उभारली जाईल. सध्या भारतात सुमारे ८.५ लाख सहकारी संस्था असून त्यांचे ३० कोटींहून अधिक सदस्य आहेत, या सर्वांसाठी नवीन सहकारी विमा कंपनी संरक्षक कवच पुरवेल.

काँग्रेस सरकारच्या काळात म्हणजेच २०१४ पूर्वी सहकार चळवळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. मात्र, स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे या चळवळीला ‘संजीवनी’ मिळाली आहे. केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासाठी नसून, देशातील गरिबांच्या कल्याणासाठी आणि सहकारात पारदर्शकता आणण्यासाठी धोरणे राबवत आहे, असे शहा म्हणाले.

या सोहळ्यात अमित शाह यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. यात धान्य साठवणुकीसाठी ७५,००० टन क्षमतेच्या १३५ गोदामांचे हस्तांतरण, ८५ नवीन गोदामांचे उद्घाटन आणि ४७ गोदामांचे भूमीपूजन करण्यात आले. ‘भारतीय बीज सहकारी समिती’च्या वतीने महाराष्ट्रातील जळगाव आणि उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे अत्याधुनिक टिश्यू कल्चर सुविधांचे भूमीपूजन करण्यात आले. अमूल आणि ‘एनसीसीएफ’ यांच्या माध्यमातून ‘सहकार वन’ प्रकल्पाची पायाभरणी झाली.

या कार्यक्रमात केंद्रीय दुग्धव्यवसाय आणि पशुपालनमंत्री राजीव रंजन सिंग यांनी पूर्वी सहकार क्षेत्रावर ‘माफियां’चे राज्य होते असा आरोप करत काँग्रेसवर टीका केली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराचे केंद्र बनल्याचा आरोप केला. विद्यमान एनडीए सरकारने गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात व्यावसायिकता आणल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बीबीएसएसएल आणि आयसीएआर यांच्यात बियाणे प्रणाली मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला, तसेच शहा यांच्या हस्ते दुग्ध सहकारी संस्थांसाठीचे नवीन उपविधी आणि मंत्रालयाच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

५० हजार सोसायट्यांचे डिजिटायझेशन

सहकार क्षेत्राच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलत, देशातील ५०,००० प्राथमिक कृषी सहकारी संस्था आता ‘ई-पॅक्स’मध्ये रूपांतरित करण्यात आल्याची घोषणा शहा यांनी केली. तसेच, सहकार क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी गुजरातमधील आणंद येथे ‘त्रिभुवन सहकारी विद्यापीठ’ स्थापन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.