Amitabh Bachchan Ayodhya Property : बिग बी अमिताभ बच्चन हे केवळ अभिनेते नसून एक उत्तम व्यावसायिक देखील आहेत. विशेषकरुन रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. अलिकडेच बच्चन यांनी अयोध्येत मोठी मालमत्ता खरेदी केली. मात्र, ही काही त्यांची पहिली डिल नव्हती. यापूर्वी त्यांनी एका रात्रीत अयोध्येत १५,००० स्क्वेअर फुटांचा एक भूखंड खरेदी केला होता. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या नामांकित विकासक कंपनीचे प्रमुख अभिनंदन लोढा यांनी याबाबतचा किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला.

अयोध्येतील रिअल इस्टेट क्षेत्रात अमिताभ यांनी गुंतवणूक वाढवली

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येकडे जगभरातील भाविकांचा ओढा वाढला आहे. परिणामी येथील जमिनींचे भाव गगनाला भिडले असून, बिग बींनी येथे ३५ कोटी रुपयांची आणखी एक जमीन खरेदी केली आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या नामांकित विकासक कंपनीकडून बच्चन यांनी तब्बल २.६७ एकरचा मोठा भूखंड खरेदी केला आहे. अमिताभ बच्चन यांची अयोध्येतील ही तिसरी मोठी गुंतवणूक आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिनंदन लोढांचा ‘तो’ मध्यरात्रीचा फोन!

याआधी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत ‘द सरयू’ या प्रीमियम प्रकल्पात १५,००० स्क्वेअर फुटांचा एक भूखंड खरेदी केला होता, ज्याचे मूल्य १५ कोटी रुपये होते. हा व्यवहार कसा झाला, याचा रंजक किस्सा अभिनंदन लोढा यांनी ‘द हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

एका फोनमध्ये डील पूर्ण

एकेदिवशी रात्री उशीरा माझ्या मोबाईलवर २ मिस्डकॉल आणि एक टेक्स्ट संदेश होता. ज्यात मी अमिताभ बच्चन असून वेळ मिळेल तेव्हा फोन करा असं लिहिलं होतं. मी तत्काळ फोन केला, त्यांनी मला अयोध्येत जमीन घेण्याची इच्छा बोलून दाखवली. मला वाटलं एखादा लहान किंवा सरासरी आकाराचा प्लॉट घ्यायचा असेल. पण, त्यांनी थेट विचारलं की तुमच्याकडे १५,००० स्क्वेअर फुटांचा भूखंड उपलब्ध आहे का?’ सहसा वैयक्तिक खरेदीदार एवढ्या मोठ्या आकाराची जमीन शोधत नाहीत, त्यामुळे मला आश्चर्य वाटले. आमचं बोलणं झालं आणि अवघ्या काही दिवसांत १५ कोटी कंपनीच्या खात्यावर जमा झाले.

अयोध्येत १० वर्षांत किमती गगनाला भिडणार!

  • राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येतील लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी आली आहे. देश-विदेशातील श्रीमंत व्यावसायिक, बडे गुंतवणूकदार आणि विकासक अयोध्येतील धार्मिक पर्यटनाच्या भविष्यात मोठी गुंतवणूक करत आहेत. ‘लिआसेस फोरास’ या संस्थेने “अयोध्या – अ रायझिंग ग्लोबल स्पिरिचुअल कॅपिटल” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात अयोध्येच्या बाजारपेठेची आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.
  • अहवालानुसार, अयोध्येतील जमिनीच्या किमती सध्या १९% चक्रवाढ वार्षिक विकास दराने (CAGR) वाढत आहेत.
  • आगामी काळात हा वेग आणखी वाढणार असून, वर्ष २०३५ पर्यंत अयोध्येतील रिअल इस्टेटचा विकास दर २५% पर्यंत पोहोचू शकतो.
  • या दरानुसार, अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेची किंमतही प्रचंड वाढली आहे.