मुंबई : वेदनाशामक उत्पादनांसाठी ओळखली जाणारी अमृतांजन हेल्थकेअर कंपनी आता पर्सनल केअर आणि ग्रुमिंग क्षेत्रात उतरली असून कंपनीने महिलांसाठी ‘कॉम्फी रेझर्स’ आणि वेदनांपासून आराम देणारे ‘ऑर्थो ऑईल’ ही नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. या नव्या उत्पादनांच्या माध्यमातून कंपनीने वैयक्तिक सौंदर्य संवर्धन आणि वेदना व्यवस्थापन क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.

‘कॉम्फी’ हा ब्रँड विशेषतः महिलांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार ग्रुमिंग उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. बाजारात महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वस्त रेझर्सची कमतरता असल्याने अनेक महिलांना पुरुषांसाठी तयार केलेले रेझर्स वापरावे लागतात. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे, असे कंपनीने सांगितले. या उत्पादन श्रेणीत ‘क्लोज अँड क्लीन’ आणि ‘सिल्की स्मूथ’ या दोन रेझर प्रकारांचा समावेश आहे. ‘क्लोज अँड क्लीन’ हे महिलांसाठीचे रेझर २० रुपयांत उपलब्ध असून कंपनीच्या मते ते भारतातील सर्वात स्वस्त महिला रेझर आहे. तर ‘सिल्की स्मूथ’ या प्रीमियम रेझरची किंमत ५० रुपये ठेवण्यात आली आहे. बाजारातील तत्सम उत्पादनांच्या तुलनेत ही किंमत जवळपास ५० टक्क्यांनी कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ही सर्व रेझर्स दक्षिण कोरियातील डोर्को कंपनीकडून घेतली जात असून जागतिक दर्जा आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी ही कंपनी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार केलेल्या या उत्पादनांमुळे ग्राहकांना दर्जेदार अनुभव मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला. याशिवाय अमृतांजनने ‘ऑर्थो ऑईल’ या नव्या वेदनाशामक तेलाचीही घोषणा केली आहे. विविध वनौषधींच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेले हे तेल शरीरदुखी, स्नायूंची अकडण आणि सांधेदुखीवर प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या उत्पादनाची क्लिनिकल तपासणीही करण्यात आली असून नियमित वापरामुळे वेदनांपासून आराम मिळतो, असे कंपनीने म्हटले आहे.

विशेषतः ४५ ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये बदलती जीवनशैली, वाढते वय आणि तणावामुळे होणाऱ्या वेदनांवर हे उत्पादन उपयुक्त ठरेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

“आम्ही केवळ वेदनाशामक उत्पादनांपुरते मर्यादित न राहता ग्राहकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा विस्तार करत आहोत. ‘कॉम्फी रेझर्स’ आणि ‘ऑर्थो ऑईल’च्या माध्यमातून परवडणारी आणि उच्च दर्जाची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर आहे.” नवीन उत्पादनांच्या लाँचमुळे कंपनीचा दैनंदिन आरोग्यसेवा क्षेत्रातील विस्तार अधिक मजबूत होईल, असा विश्वास अमृतांजन हेल्थकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. शंभू प्रसाद यांनी व्यक्त केला.