Anand Mahindra 2018 Post On Elon Musk: एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचे शेअर बाजारात पदार्पण झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. यामुळे ते जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ (एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले व्यक्ती) बनले आहेत. यापार्श्वभूमीवर महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी २०१८ मधील एका प्रसंगाची आठवण काढत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महिंद्रा यांनी मस्क यांच्या प्रवासावर भाष्य केले आणि टेस्लाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी मस्क यांना जाहीरपणे कसा पाठिंबा दिला होता, याची आठवण करून दिली. त्यावेळी टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि त्यांच्या कंपन्यांचे भवितव्य यांबाबत शंका व्यक्त केली जात होती.

“मी २०१८ मध्ये एलॉन यांच्याशी संपर्क साधला होता, कारण इनोव्हेटर्सची परीक्षा त्यांच्या सर्वोत्तम काळात नाही, तर अत्यंत कठीण प्रसंगांतच घेतली जाते. त्यावेळी मला त्यांची जिद्द आणि चिकाटी विशेष भावली होती. आजच्या बातम्यांमध्ये ‘ट्रिलियन-डॉलर’चा टप्पा गाठल्याची चर्चा आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, ‘आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या वास्तव बनू शकते’, यावरचा त्यांचा विश्वास कधीच कमी झाला नाही. जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल, तर तुम्ही एकाच जागी धावत राहाल”, असे महिंद्रा म्हणाले.

यावेळी महिंद्रा यांनी २०१८ मधील एका पोस्टचा संदर्भ दिला, जी त्यांनी मस्क यांच्यासाठी केली होती. त्या काळात टेस्ला उत्पादनाशी संबंधित आव्हानांशी झुंज देत होती आणि कंपनी आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकेल का, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या वेळी महिंद्रा यांनी लिहिले होते की, “एलॉन मस्क, तुम्ही धैर्य सोडू नका. तुमचा कारखाना आता वेगाने आणि सुरळीतपणे कार्यरत झाला आहे. जगाला तुमच्यासारख्या प्रेरणादायी इनोव्हेटर्सची गरज आहे.”

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टकडे त्यावेळी फार कोणाचे लक्ष गेले नव्हते, परंतु स्पेसएक्सच्या शेअर बाजारातील दमदार पदार्पणानंतर मस्क यांच्या एकूण संपत्तीने १ ट्रिलियन डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे, या आठवड्यात आनंद महिंद्रा यांची २०१८ मधील ती पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

स्पेसएक्सचे वॉल स्ट्रीटवरील पदार्पण

१२ जून २०२६ रोजी स्पेसएक्सने ‘SPCX’ या टिकर चिन्हासह अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक नॅस्डॅकवर इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आणून वॉल स्ट्रीटवर ऐतिहासिक पदार्पण केले. एरोस्पेस क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने ७५ अब्ज डॉलर्स उभारले, आपले सुरुवातीचे मूल्यांकन २ ट्रिलियन डॉलर्सच्या वर नेले आणि सीईओ एलॉन मस्क यांना जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ बनवले.