Anil Agarwal Vedanta Adani Ambani Aluminium Sector Competition: ॲल्युमिनियम क्षेत्रात अदाणी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवेशामुळे या उद्योगातील स्पर्धा आणखी वाढेल आणि कार्यक्षमता सुधारेल, असे विधान वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले. तसेच, या क्षेत्रात आणखी कंपन्यांच्या आगमनामुळे भविष्यात विलीनीकरण आणि अधिग्रहणास वाव मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.
अग्रवाल म्हणाले की, देशांतर्गत ॲल्युमिनियम उद्योगात सध्या वेदांता, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी हे तीन प्रमुख उत्पादक आहेत. या क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांचा उल्लेख करताना त्यांनी हिंडाल्को आणि नाल्को यांची नावे घेतली आणि त्यानंतर नवीन स्पर्धकांच्या प्रवेशाकडे लक्ष वेधले.
“आम्ही स्पर्धेचे स्वागत करतो. स्पर्धेमुळे तुमची कार्यक्षमता वाढते”, असे अग्रवाल यांनी फायनान्शिएल एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. ते म्हणाले की, मोठ्या व्यावसायिक समूहांच्या प्रवेशामुळे या क्षेत्रात अधिक स्पर्धा निर्माण होईल. भविष्यात यामुळे एकत्रीकरण घडून येऊ शकते.
अग्रवाल यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरते कारण प्राथमिक ॲल्युमिनियम क्षेत्रात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर ‘द्वि-अधिकारशाही’ (Duopoly) राहिली आहे. ज्यामध्ये वेदांता आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजचे सुमारे ९०% उत्पादन क्षमतेवर वर्चस्व आहे.
अदाणी एंटरप्रायझेसने, युएई-स्थित इंटरनॅशनल रिसोर्सेस होल्डिंगसोबत मिळून ओडिशामध्ये ११.५ अब्ज डॉलर्सच्या ॲल्युमिनियम प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामध्ये ४ दशलक्ष टन क्षमतेची ॲल्युमिना रिफायनरी, २ दशलक्ष टन क्षमतेचा ॲल्युमिनियम स्मेल्टर आणि १ दशलक्ष टन क्षमतेचा डाउनस्ट्रीम मॅन्युफॅक्चरिंग पार्क यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजने ओडिशामधील कारलापट बॉक्साइट ब्लॉकसाठी निविदा कागदपत्रे खरेदी केले आहेत, ज्यामध्ये अनेक मोठ्या औद्योगिक समूहांनी रस दाखवला आहे.
जो कार्यक्षम असेल तोच टिकेल
अग्रवाल म्हणाले की, नवीन कंपन्यांच्या प्रवेशानंतरही वेदांता आपला ॲल्युमिनियम व्यवसाय विस्तारत राहील. “आमची योजना तयार आहे. आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत”, असे ते म्हणाले. वेदांताचे पुढील तीन वर्षांत सुमारे ६ दशलक्ष टन आणि दीर्घ कालावधीत १० दशलक्ष टन ॲल्युमिनियम उत्पादन क्षमतेचे लक्ष्य आहे.
“जो कार्यक्षम असेल तोच टिकेल”, असे अग्रवाल पुढे म्हणाले. स्पर्धेमुळे कंपन्यांना उत्पादकता आणि खर्च सुधारण्यास भाग पडेल, असेही त्यांनी पुढे सांगितले. उद्योग जसजसा विकसित होईल, तसतसे अधिक कंपन्यांच्या उदयानंतर अखेरीस विलीनीकरण होऊ शकते, असेही ते म्हणाले.
