Anil Agarwal Vedanta FIR Filed Boiler Explosion at Vedanta Power: छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटात २० कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, कंपनीचे व्यवस्थापक देवेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शक्ती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांच्या माहितीनुसार, दाभ्रा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधितांवर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. “वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह आठ ते दहा व्यक्तींची नावे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहेत. तपासादरम्यान आणखी काही व्यक्ती या घटनेस जबाबदार असल्याचे आढळल्यास, त्यांची नावेही यात समाविष्ट केली जातील,” असे ठाकूर यांनी सांगितले.
कधी घडली घटना?
१४ एप्रिल रोजी सिंहितराई गावातील कारखान्यात हा स्फोट झाला. यावेळी बॉयलरमधून टर्बाइनकडे उच्च दाबाची वाफ वाहून नेणारी एक पोलादी नळी फुटली, ज्यामुळे अनेक कामगार गंभीररित्या भाजले गेले. या घटनेत २० जणांचा बळी गेला, तर १६ जण जखमी झाले.
पोलीस तपासात काय आढळले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तांत्रिक तपासामध्ये असे आढळून आले की, बॉयलरच्या भट्टीमध्ये (फर्नेसमध्ये) इंधनाचा अतिरिक्त साठा झाल्यामुळे दाब वाढला आणि त्यातूनच हा स्फोट घडला. “मुख्य बॉयलर निरीक्षकांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, भट्टीमध्ये इंधनाचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे प्रचंड दाब निर्माण झाला आणि त्यामुळे बॉयलरमध्ये स्फोट झाला. या दाबामुळे बॉयलरची एक खालची नळी (पाइप) तिच्या नियोजित जागेवरून निसटली, ज्याचा परिणाम म्हणून हा गंभीर अपघात घडला”, असे पोलिसांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात कंपनीवर ठपका
शक्ती येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, इंधनाचा साठा आणि त्यामुळे निर्माण झालेला अतिरिक्त दाब हीच या स्फोटाची मुख्य कारणे होती.
तपासादरम्यान, अधिकाऱ्यांच्या असे निदर्शनास आले की, वेदांता आणि त्यांचे कंत्राटदार NGSL (NTPC GE Power Services Limited) यांनी यंत्रसामग्री व उपकरणांच्या देखभाल आणि परिचालन मानकांचे योग्य प्रकारे पालन केले नव्हते. “देखभालीतील त्रुटी आणि निष्काळजीपणाने केलेल्या संचालनामुळे बॉयलरच्या दाबात अचानक चढ-उतार झाले आणि अखेरीस हा अपघात घडला. उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक निष्कर्षांच्या आधारे, प्रथमदर्शनी निष्काळजीपणा सिद्ध झाला आहे. त्यानंतरच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला,” असे या अहवालात म्हटले आहे.
