Vedanta Anil Agarwal Success Story: देशातील आघाडीच्या उद्योपतींपैकी एक असलेले वेदांता समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल हे त्यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी आणि चिकाटीसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी वेदांता ही अनेक व्यवसाय असलेली शेअर बाजारातील एक सूचीबद्ध ​​कंपनी होती. पण नुकतेच या एक कंपनीचे वेदांत ॲल्युमिनियम, वेदांत आयर्न अँड स्टील, वेदांत ऑइल अँड गॅस, वेदांत पॉवर आणि वेदांत लिमिटेड अशा पाच कंपन्यांमध्ये विभाजन केले असून पाचही कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. यांचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे ६ लाख कोटी रुपये आहे. अनिल अग्रवाल यांना असा विश्वास आहे की, या पाचही कंपन्या येत्या काळात प्रत्येकी १०० अब्ज डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या कंपन्या बनू शकतात.

आज लाखो कोटी रुपयांचे उद्योग उभारणाऱ्या अनिल अग्रवाल यांच्या मनात कर्मभूमी मुंबईबाबत एक वेगळे स्थान आहे. अनिल अग्रवाल यांनी अनेक देश आणि शहरांना भेटी दिल्या आहेत, पण मुंबईची सर कशालाच येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. “मला ‘आमची मुंबई’ खूप आवडते. त्यात काहीतरी खास आहे”, असे ते म्हणतात.

इतर अनेकांप्रमाणेच, तेही मुंबईमध्ये उपजीविकेच्या शोधात आले होते. तो काळ १९७० च्या दशकाच्या मध्यातील होता. बिहारच्या पाटण्यातील एक तरुण असलेल्या अग्रवाल यांना तो काळ आजही आठवतो. “मुंबईत पाऊल ठेवताना माझ्याजवळ फक्त एक पेटी आणि एक स्वप्न होतं”, असे ते सांगतात. याबाबत बिझनेस टुडेच्या वृत्तात उल्लेख आहे.

अग्रवाल सध्या लंडनमध्ये राहत असले तरी, त्यांची साधी हिंदी असो वा अस्सल विनोदबुद्धी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक पैलू भारतीयच आहे. चेहऱ्यावर हलकेसे हास्य आणत ते भूतकाळातील महत्त्वाच्या घटना निवडतात, त्यांची वर्तमानाशी सांगड घालतात आणि भविष्याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करतात.

“अर्थातच, या प्रवासात अनेक अपयशे आली. पण त्यामुळे मी दारा सिंग यांच्यासारखा अधिकच खंबीर झालो. हे सर्व माझ्या धैर्यामुळे आणि अनेक लोकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे”, असे ते म्हणतात.

वेदांता समूहाचा भविष्यातील दृष्टीकोण

वेदांता समूहाच्या भविष्यातील दृष्टीकोणाविषयी ते म्हणतात, “ही तर केवळ सुरुवात आहे. ॲल्युमिनियम क्षेत्रात आम्ही मिश्रधातूंची निर्मिती वाढवून उत्पादन खर्च किमान २० टक्क्यांनी कमी करणार आहोत. खाणकामात आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून कंट्रोल रूममधून कामकाज चालवणार आहोत. प्रत्येक व्यवसायात खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे हे आमचे ध्येय आहे.”

“वेदांतासाठी हा मोठ्या परिवर्तनाचा काळ आहे. कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे भांडवल उभारणीचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. माझ्या दृष्टीने, हा एक नवा वेदांता समूह आहे”, अशा शब्दांत अग्रवाल यांनी वेदांताबाबत भाष्य केल्यचा उल्लेखही बिझनेस टुडेच्या वृत्तात आहे.