Anil Ambani ED Case : अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा फास अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाभोवती अधिक घट्ट केला आहे. ताज्या कारवाईत, ईडीने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या ३,०३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. हा अनिल अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोणती मालमत्ता झाली जप्त?

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील आलिशान फ्लॅट, खंडाळ्यातील फार्महाऊस, अहमदाबादेतील साणंद येथील जमिनीचा भूखंड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे ७.७१ कोटी शेअर्स यांचा समावेश आहे. या ताज्या कारवाईमुळे या समूहाची आतापर्यंत जप्त केलेली एकूण मालमत्ता १९,३४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आरकॉमच्या २ अधिकाऱ्यांना अटक

बँक फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा समांतर तपास करत आहेत. २० एप्रिल रोजी सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना (अनिल कालया आणि डी. विश्वनाथ) अटक केली आहे. हा तपास प्रामुख्याने RHFL आणि RCFL शी संबंधित ११,००० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीवर केंद्रित आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, ज्या दिवशी बँकांकडून कर्ज मंजूर व्हायचे, त्याच दिवशी तो निधी समूहाच्या नियंत्रणाखालील शेल कंपन्यांकडे वळवला जायचा. धक्कादायक बाब म्हणजे, ही खाती त्याच दिवशी ‘एनपीए’ (थकीत कर्ज) म्हणून घोषित व्हायची, असे डिजिटल पुरावे ईमेलच्या माध्यमातून हाती लागले आहेत.

न्यायालयीन दणका आणि समूहाची भूमिका

या कारवाईविरोधात अनिल अंबानी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या तीन याचिका फेटाळून लावल्या. बँकांनी त्यांची खाती फसवणूक म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा २०१९ पासून समूहाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिले.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

या कारवाईमुळे रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवरच्या शेअर्सवर बाजारात मोठा दबाव पाहायला मिळू शकतो. गुंतवणूकदारांनी अशा कायदेशीर गुंतागुंतीत अडकलेल्या शेअर्सपासून सावध राहणे केव्हाही चांगले. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स पॉवर किंवा आरकॉम सारखे शेअर्स असतील, तर तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत त्यांचे प्रमाण किती आहे, हे तपासा. जर तोटा मर्यादित असेल, तर ‘स्टॉप लॉस’ लावून बाहेर पडणे किंवा गुंतवणूक कमी करणे हिताचे ठरू शकते.