Ankur Warikoo Shares 5 Challenges : डिजिटल क्रिएटर आणि प्रसिद्ध लेखक अंकुर वारिकू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी पुढील ५ महिन्यांत स्वतःमध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी ५ अत्यंत साधी पण तितकीच प्रभावी आव्हाने दिली आहेत. कोणताही व्यक्ती एका रात्रीत यशस्वी होत नसतो, तर तो रोजच्या आयुष्यातील लहान-लहान सवयी आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असतो. वैयक्तिक विकास, कार्यक्षमता वाढवणे, नातेसंबंध सुधारणे किंवा योग्य निर्णय घेणे हे सर्व रोजच्या साध्या निवडींवर अवलंबून असते. याच संदर्भात अंकुर वारिकू यांची ही आव्हाने आहेत, जे तुम्हाला आतून-बाहेरुन बदलू शकतात.

स्वतःमधील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी शोधणे

यातील पहिले आव्हान म्हणजे स्वतःचे शक्तीस्थळ आणि नकारात्मक घटकांचा शोध घेणे आहे. आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टींचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. वारिकू यांच्या मते, माणसाने रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायला हवी. आपले काम, नातेसंबंध, लोकांच्या गाठीभेटी आणि अगदी आपण कोणत्या प्रकारच्या बातम्या वाचतो किंवा पाहतो, या सर्वांचा आपल्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे आनंद मिळतो आणि कोणत्या गोष्टींमुळे मानसिक ताण वाढतो, याचे एक स्पष्ट चित्र समोर येते आणि माणूस अधिक जागरूकपणे योग्य गोष्टींची निवड करू शकतो.

कामाचे योग्य नियोजन

आपल्या दैनदिन आयुष्यात अनेकदा क्षुल्लक गोष्टींसाठी आपण आपली मानसिक उर्जा खर्च करतो. उदा. रोज सकाळी उठल्यावर काय कपडे घालायचे, दिवसभरात काय कामे करायची? ही मानसिक ऊर्जा वाचवण्यासाठी वारिकू यांनी अशा दैनंदिन सवयींचे निर्णय आधीच किंवा आदल्या रात्री ठरवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अशा छोट्या निवडी आधीच निश्चित केल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो आणि वाचलेली मानसिक ऊर्जा महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वापरता येते, ज्यामुळे उत्पादकतेत मोठी वाढ होते.

कृतज्ञता डायरी

तिसरे आव्हान अत्यंत साधे पण मनाला शांतता देणारे आहे, ते म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘कृतज्ञता डायरी’ लिहिणे. दिवसभरात घडलेल्या कोणत्याही एका चांगल्या गोष्टीबद्दल किंवा प्रसंगामुळे मिळालेल्या आनंदाबद्दल केवळ एक ओळ लिहिण्याची ही सवय आहे. हा सराव दिसायला लहान असला तरी दीर्घकाळात माणसाचा दृष्टिकोन सकारात्मक बनवतो. यामुळे माणूस तक्रार करण्याऐवजी आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागतो आणि छोट्या-छोट्या क्षणांचे कौतुक करायला शिकतो.

आर्थिक शिस्तीचा महत्त्वाचा नियम

चौथे आव्हान आजच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या ‘आर्थिक शिस्ती’वर आधारित आहे, ज्याला ‘पाच दिवसांचा नियम’ असे म्हटले गेले आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात अनेकदा लोक भावनेच्या भरात किंवा तात्पुरत्या आकर्षणापोटी अनावश्यक वस्तू खरेदी करतात. हे टाळण्यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला पाच दिवस थांबवण्याचा सल्ला वारिकू देतात. या पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्वतःलाच प्रश्न विचारा की, ती वस्तू खरोखरच तितकी महत्त्वाची आहे का? हा एक साधा नियम उधळपट्टी थांबवतो आणि तात्पुरती इच्छा व खरी गरज यामधील फरक ओळखण्यास मदत करतो.

तक्रार करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या

सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे तक्रारी करणे बंद करुन प्रश्न सोडवण्यावर भर देणे. सतत तक्रार करत राहिल्याने माणसाची मानसिकता एखाद्या पीडितासारखी होते. अडचणींकडे एक आव्हान म्हणून पाहिले तर त्यावर काय तोडगा काढता येईल या दृष्टिकोनातून विचार केल्यास माणसाचा आत्मविश्वास आणि भावनिक ताकद वाढते. अंकुर वारिकू यांच्या मते, हे आव्हान पेलणे जरी कठीण असले, तरी व्यक्तीच्या वैयक्तिक विकासावर आणि मानसिक कणखरतेवर याचा सर्वात मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होतो. या पाच सवयी पुढील पाच महिने पाळल्यास आयुष्य अधिक समृद्ध आणि समाधानी बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.