Anupam Mittal Shark Tank India Startup Failure Reason LinkedIn Post: देशातील प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम शार्क टँक इंडियाचे जज आणि शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि अनुपम मित्तल यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अपयशी होणाऱ्या व्यवसायांवर भाष्य केले आहे. आपला युक्तीवाद करताना मित्तल यांनी म्हटले की, कंपन्या खरेच महत्त्वाच्या असलेल्या समस्या सोडवण्याऐवजी कामांच्या लांबलचक यादीवर लक्ष केंद्रित करून अनेकदा कृतीलाच प्रगती समजण्याची चूक करतात डझनभर योजना तयार करून व्यवसाय यशस्वी होत नाहीत.

अनुपम मित्तल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “कामांची लांबलचक यादी करून तुम्ही जिंकत नाही. बहुतेक योजना म्हणजे फक्त पूर्ण करायच्या २५ ते ५० गोष्टींची यादी असते. त्यामुळे काम केल्याचा आभास होतो. हा प्रगती झाल्याचा खोटा आभास आहे. एखाद्या कंपनीत किंवा टीममध्ये, सहसा १ किंवा २ अडथळे असतात जे त्यांना मागे खेचत असतात. त्यामुळे नेतृत्ताने ते अडथळे शोधण्याचे सोपे काम केले पाहिजे. यासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक बळ लावा. बाकी सर्व गोष्टी नेहमीसारख्याच ठेवा. याचा एखाद्या मोठ्या यशासारखा त्याचा उत्सव साजरा करू नका. वाढीचा मार्ग मोकळा करणाऱ्या १ किंवा २ गोष्टींवर ८०% ताकद लावा. बाकी सर्व फक्त नेहमी चालणारे आवश्यक काम आहे.”

कोण आहेत अनुपम मित्तल?

अनुपम मित्तल यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार म्हणून २० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी ‘Shaadi.com’, ‘Makaan.com’ आणि ‘Mauj Mobile’ यांसारख्या तंत्रज्ञान आणि डायरेक्ट टू कस्टमर क्षेत्रातील अनेक यशस्वी कंपन्या व ब्रँड्स उभारून त्यांचा विस्तार केला आहे.

याचबरोबर मित्तल ‘पीपल ग्रुप’चे संस्थापक आणि सीईओ आहेत. ही संस्था तंत्रज्ञान आणि डायरेक्ट टू कस्टमर कंपन्यांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली एक नामांकित कंपनी आणि गुंतवणूकदार आहे. ज्यामध्ये जगातील आघाडीची मॅचमेकिंग कंपनी असलेल्या ‘Shaadi.com’ चाही समावेश आहे.

२०० हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक

अनुपम मित्तल यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रिततेच्या माध्यमातून मूल्य आणि प्रभाव निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी २०० हून अधिक टेक आणि ब्रँड स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ओला, द्रुवा, रुपीक, ॲनिमॉल, अग्निकुल, फारआय, नेक्स्टवेव्ह, क्विझेझ आणि स्किप्पी, हेअर ओरिजिनल्स, झिलियनेअर व व्हॉट्सअप वेलनेस यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे.