भारतात आयफोनच्या वाढत्या मागणीसह मॅक संगणक आणि सेवा व्यवसायाच्या विस्तारामुळे ॲपलने सप्टेंबर तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला आहे. मॅक आणि सेवा व्यवसायानेही भारतात महसुलाचा नवा उच्चांक गाठला असून, आयफोन बदलून नवे मॉडेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या सप्टेंबर तिमाहीत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भारत ही ॲपलसाठी महत्त्वाची आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरत असल्याचे या कामगिरीतून स्पष्ट झाले आहे.
भारतासह अमेरिका, युरोप, चीन आणि आशिया-पॅसिफिकमधील अन्य बाजारपेठांमध्ये सप्टेंबर तिमाहीतील महसुलाचे विक्रम प्रस्थापित झाल्याचे अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन टर्नस यांनी सांगितले. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कंपनीने सप्टेंबर तिमाहीतील महसुलाचा उच्चांक गाठला. त्यात भारतातील आतापर्यंतच्या सर्वाधिक महसुलाचाही समावेश आहे, असे टर्नस यांनी नमूद केले.
जागतिक स्तरावर ॲपलच्या आयफोन व्यवसायाच्या महसुलात वार्षिक तुलनेत १७ टक्क्यांची वाढ होऊन तो ५७.६ अब्ज डॉलरवर पोहोचला. पुरवठ्यातील मर्यादा आणि परकीय चलन विनिमय दरातील प्रतिकूल परिस्थिती असूनही कंपनीने ही वाढ नोंदवली. कंपनीच्या मॅक व्यवसायाच्या जागतिक महसुलात वार्षिक तुलनेत २४ टक्क्यांची वाढ होऊन तो १०.८ अब्ज डॉलरवर पोहोचला. भारत आणि आग्नेय आशियातील बाजारपेठांमध्ये मॅक व्यवसायाने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला. ॲपलच्या सेवा व्यवसायानेही भारतात महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. जागतिक स्तरावर या व्यवसायाचा महसूल वार्षिक तुलनेत १० टक्क्यांनी वाढून ३१.६ अब्ज डॉलरवर पोहोचला. परकीय चलन विनिमय दरातील प्रतिकूल बदलांचा परिणाम असूनही सेवा व्यवसायाने ही वाढ साध्य केली, असे अॅपलचे मुख्य वित्त अधिकारी केवन पारेख यांनी सांगितले.
ग्राहकांची पहिली पसंती आयफोन १७ ला
भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत आयफोन १७ सर्वाधिक विक्री झालेला फोन ठरला आहे. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत देशात सर्वाधिक पुरवठा झालेल्या स्मार्टफोन मॉडेलमध्ये आयफोन १७ अव्वल ठरला. त्याचप्रमाणे, मॅकबुक निओच्या विक्रीनेही तिमाहीतील आतापर्यंतचा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे, आयफोनच्या पुरवठ्यात वार्षिक तुलनेत घट होऊनही भारतातील अॅपलच्या आयफोनची सरासरी विक्री किंमत प्रथमच एक हजार डॉलरच्या पुढे गेली. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. भारतातील आयफोन वापरकर्त्यांची सक्रिय संख्या देखील लक्षणीय मोठी आहे.
